सौदी अरेबियामध्ये १० हजार भारतीयांची उपासमार - सुषमा स्वराज
By admin | Published: July 31, 2016 10:18 AM2016-07-31T10:18:17+5:302016-07-31T10:18:17+5:30
अचानक नोक-या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये १० हजारहून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - अचानक नोक-या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये १० हजारहून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत आहेत. आर्थिक चणचणीमुळे हजारो कामगारांना उपाशीपोटी रहावे लागत आहे. केंद्र सरकारने आखाती देशांमधील आपल्या दूतावासांना या बेरोजगार कामगारांना अन्य मदतीबरोबर अन्न-पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीमध्ये रहाणा-या तीस लाख भारतीयांना या कठीण काळात आपल्या बंधु-भगिनीना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी टि्वटरवरुन दिली.
कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये रहाणारे भारतीय नोकरी आणि वेतन संकटाचा सामना करत आहेत. सध्या परिस्थिती खूपच खराब आहे असे त्यांनी सांगितले. जेद्दाहमध्ये तीन दिवसांपासून ८०० भारतीय उपाशी असल्याचे एका भारतीयाने टि्वट करुन सांगितल्यानंतर भारत सरकारकडून पावले उचलण्यात आली.
सौदीमध्ये अन्नाविना फक्त ८०० भारतीयांचेच नव्हे तर, दहाहजाराहून अधिक भारतीयांचे हाल होत असल्याची माहिती स्वराज यांनी दिली. समस्येचे गांर्भीय समजून घेण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह लवकरच सौदी अरेबियाच्या दौ-यावर जाणार आहेत.
सौदी अरेबियामध्ये एकही कामगार उपाशी रहाणार नाही याचे मी तुम्हाला आश्वासन देते. मी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सौदी, कुवेतमध्ये अनेक मालकांनी कामगारांचे वेतन न देता कारखान्याला टाळी लावली त्यामुळे हजारो भारतीय कामगार रस्त्यावर आले आहेत.