कुराणचे पाठांतर चुकले, १० वर्षाच्या मुलाला १७० दंड बैठकांची शिक्षा
By admin | Published: March 22, 2015 05:45 PM2015-03-22T17:45:18+5:302015-03-22T17:45:38+5:30
इस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणचे योग्य पाठांतर न केल्याने उत्तरप्रदेशमधील एका मौलवीने १० वर्षाच्या मुलाला तब्बल १७० दंड बैठका काढायला लावून त्याला अमानूष मारहाण केली.
ऑनलाइन लोकमत
बरेली (उत्तरप्रदेश), दि. २२ - इस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणचे योग्य पाठांतर न केल्याने उत्तरप्रदेशमधील एका मौलवीने १० वर्षाच्या मुलाला तब्बल १७० दंड बैठका काढायला लावून त्याला अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीनंतर मुलगा बेशुद्ध झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. घटनेनंतर मौलवीने पळ काढला आहे.
बरेली येथे मदरसामध्ये शिकणा-या मुलांना कुराणचे पाठांतर करायला सांगितले होते. १० वर्षाच्या एका विद्यार्थ्याचे कुराणचे पाठांतर झाले नव्हते. पाठांतर चुकत असल्याने मदरसामधील मौलवींचा पारा भलताच चढला. त्यांनी मुलाला १७० दंडबैठका काढण्याची शिक्षा दिली. यावरही त्यांचे मन भरले नाही. त्यांनी मुलाला पट्टीने अमानूष मारहाण केली, त्याचे केसही ओढले. ही अमानूष मारहाणीमुळे तो लहान मुलगा बेशुद्ध झाला. पिडीत मुलावर रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाच्या पालकांनी संबंधीत मौलवी व मदरशा प्रशासन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.