पंतप्रधानांच्या आवाहनाला 10 वर्षांच्या मुलाचा प्रतिसाद, घरीच तयार केला मास्क; मोदींनी 'अशा' शब्दात केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:51 PM2020-04-15T12:51:44+5:302020-04-15T13:09:43+5:30
देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. देशभरात लॉकडाऊन वाढल्यानंतर गृहमंत्रालयाकडून आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी घरगुती साधनांचा वापर करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा सामान्य जनतेवरही मोठा परिणाम होत असल्याचे बघायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या याच आवाहनाचा एका 10 वर्षांच्या मुलावर असा काही परिणाम झाला, की त्याने आपल्या घरीच स्वतःचा मास्क स्वतः तयार केला. यामुलाने शिलाई मशीनच्या सहाय्याने हा मास्क तयार केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मुलाचे कौतुक केले आहे.
हेमंत गुप्ता नामक एक व्यक्तीने ट्विटरवर आपल्या भाच्याचे किंवा पुतण्याचे काही फोटो टाकले होते. यावर त्यांनी लिहिले होते, की "मोदीजींनी घरीच तयार केलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या 10 वर्षांच्या नेफ्यूवर (भाचा अथवा पुतण्या) याचा चांगला परिणाम झाला आहे. यामुळे त्याने घरातच स्वतःसाठी मास्क तयार केला. यावेळी तो शिलाई मशीनचा वापर कशाप्रकारे केला जातो, हेही शिकला." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाचे कौतुक करत "कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत या मुलाने बजावलेली भूमिका नेहमीच स्मरणात राहील," असे ट्विट केले आहे.
Kudos to him.
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2020
We will always remember the proactive role children played in this fight against Coronavirus. https://t.co/bpikj8ku54
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आपल्या ट्विटर पेजवरील प्रोफाईल फोटो बदलला होता. यात फोटोत नरेंद्र मोदी यांनी एका गमछाचा मास्क सारखा वापर केल्याचे दिसत आहे. याचा उद्देश, कोरोनापासून बचावासाठी आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचाही वापर करू शकतो, असा आहे.
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य -
देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. देशभरात लॉकडाऊन वाढल्यानंतर गृहमंत्रालयाकडून आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.