भारीच! कोरोनावरील लस घेतली अन् अवघ्या ५ दिवसांत १० वर्ष जुना आजार 'छूमंतर'; शिक्षकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:51 PM2021-05-19T18:51:26+5:302021-05-19T18:51:53+5:30
कोरोना लस घेतल्यानंतर अवघ्या ५ दिवसांत १० वर्षे जुना आजार बरा झाल्याचा शिक्षकाचा दावा
भोपाळ: देशातील आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच लसीकरणाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्स जाणवतील अशी भीती अनेकांना जाणवते. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. मग कशाला लस घ्यायची असा प्रश्नदेखील काहीजण उपस्थित करतात. मात्र मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला वेगळाच अनुभव आला आहे.
त्या व्यक्तींना तीन महिन्यांनी मिळेल कोरोनावरील लस, NEGVAC च्या शिफारशीला आरोग्य मंत्रालयाची मान्यता
मध्य प्रदेशातल्या बडवानीमध्ये राहत असलेल्या एका शिक्षकानं कोरोनाची लस घेतली. यानंतर १० वर्षांपासून असलेली खरूज बरी झाल्याचा दावा त्यानं केला. १० वर्षांपासून असलेला खरुजेचा त्रास संपूर्ण बरा झाल्याचं शिक्षक काशीराम यांनी सांगितलं. गेल्या दशकभरापासून काशीराम यांना खरुजेचा त्रास सुरू होता. त्यांनी विविध प्रकारचे उपचार केले. मात्र तरीही त्यांना होणारा त्रास वाढतच होता. त्यांना खुर्चीवरून बसल्यानंतर जमिनीवर पायदेखील ठेवता येत नव्हता. मात्र लस घेतल्यानंतर ५ दिवसांतच त्यांना आराम पडला आणि त्यांची खरुजेची समस्या संपली.
...तर आणि तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव शक्य; IMAच्या अध्यक्षांचा मोलाचा सल्ला
ग्राम कुंजरीमध्ये वास्तव्यास असलेले काशीराम कनोजे भंवरगढ येथील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. १० वर्षांपासून त्यांना पायांमध्ये जळजळ जाणवत होती. त्यामुळे ते खूप त्रासले होते. पायात खूप जळजळ जाणवत असल्यानं त्यांना नीट बसताही येत नव्हतं. शाळेत खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना जमिनीव पाय ठेवता यायचे नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्या खुर्चीवर पाय सोडून बसायचे. त्यांना चालतानादेखील वेदना व्हायच्या. पायाला तेलानं मालीश केल्यानंतर त्यांना आराम मिळायचा. पण तो तात्पुरत्या स्वरुपाचा असायचा. ११ एप्रिलला त्यांनी जामनिया उपआरोग्य केंद्रात कोरोनावरील लस घेतली. त्यानंतर पाचच दिवसानंतर त्यांच्या पायाची जळजळ थांबली.