ओळख, लग्न लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; कायदेविषयक संसदीय समितीने केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 08:41 AM2023-10-28T08:41:49+5:302023-10-28T08:42:11+5:30
तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार असून, तसे विधेयकही संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : विवाह झाल्याचे अथवा खरी ओळख लपवून एखाद्या महिलेबरोबर प्रेमसंबंध, शरीरसंबंध प्रस्थापित करणे किंवा तिच्याशी विवाह करणे आता गुन्हा ठरविण्यात येणार आहे. यातील दोषी व्यक्तीला १० वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकेल. तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार असून, तसे विधेयकही संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.
कायदेविषयक संसदीय समितीने या प्रस्तावित कायद्याबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ही शिफारस केली आहे. फसवणूक करण्याच्या पद्धतीबाबत एक प्रकरण आहे. विवाहित असल्याचे लपवून लोक महिलांना जाळ्यात ओढतात. अशा व्यक्तींना कडक शिक्षा देणे आवश्यक असल्याचे मत या प्रकरणात व्यक्त करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
काय आहे बीएनएसमधील ६९वे कलम?
भारतीय न्याय संहितेमधील (बीएनएस) कलम ६९मध्ये म्हटले आहे की, महिलेला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्या महिलेशी विवाह न करता शरीरसंबंध ठेवले जातात. अशा प्रकरणात त्या दोषी व्यक्तीला १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होणे आवश्यक आहे, तसेच त्याला दंडही ठोठावण्यात येईल. नोकरी, प्रमोशन देण्याचे आमिष दाखवून किंवा आपली खरी ओळख लपवून महिलेशी विवाह करणे हा फसवणुकीचा प्रकार गुन्हा असल्याचे मानण्यात येईल, असे बीएनएसच्या ६९व्या कलमात म्हटले आहे.
लव्ह जिहादबाबत...
लव्ह जिहादच्या संदर्भात देशभरात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्या मुद्द्याच्या अनुषंगानेही काही तरतुदी नव्या विधेयकात केल्या जाण्याची शक्यता आहे.
अहवालात काय?
आपली खरी माहिती लपवून महिलांशी प्रेमसंबंध, शरीरसंबंध ठेवणाऱ्या किंवा त्यांच्याशी विवाह करणाऱ्यांचे हे कृत्य भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९नुसार गुन्हा असल्याचे मानण्यात यावे.