काश्मीरमध्ये राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह १०० अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:02 AM2019-08-08T02:02:57+5:302019-08-08T06:17:36+5:30
सुरक्षा दले सतर्क; शांतता कायम राखण्यासाठी दक्षता
जम्मू : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हिंसाचार भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह शंभर जणांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. यासंदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमधील लँडलाईन, इंटरनेट, मोबाईल फोन काही काळापुरते बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबरोबरच काही राजकीय नेते, कार्यकर्ते यांनाही अटक झाली आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना रविवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या नेत्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन, इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना सध्या हरिनिवास याठिकाणी ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानची खदखद
३७० कलमातील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाºया तरतुदी रद्द करण्याबद्दलचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आला होता. राज्यसभेने सोमवारी व लोकसभेने मंगळवारी या प्रस्तावाला संमती दिली. हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर काही तासांतच काश्मीरमधील निवडक राजकीय नेते व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. भारताच्या काश्मीर व लडाखबाबतच्या निर्णयाला पाकिस्तान व चीनने कडाडून विरोध केला आहे.
३७० कलमातील काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या तरतुदी रद्द
राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या ३७० कलमातील तरतुदी रद्द केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केले. या कलमासंदर्भातले विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींनी ही घोषणा केली आहे.
यासंदर्भातील अधिसूचनेवर राष्ट्रपतींनी मंगळवारी रात्री स्वाक्षरी केली. या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० च्या उपकलम १ व ३ ने दिलेल्या अधिकारानुसार, तसेच संसदेने केलेल्या शिफारसीनुसार ३७० कलमातील सर्व उपकलमांचा वापर ६ ऑगस्टपासून संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेत वेळोवेळी करण्यात येणाºया दुरुस्त्या, तसेच बदल यापुढे जम्मू-काश्मीर राज्याला लागू असतील.
विलक्षण गुप्तता
काश्मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय परिमाण असल्याने हा प्रस्ताव राज्यसभेत सादर करेपर्यंत सरकारने त्याबाबत खूपच गुप्तता बाळगली होती. प्रस्ताव सादर करण्याच्या पंधरा दिवस आधीपासून काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली.
रविवारी रात्री काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काश्मीरमध्ये जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले. अशी सारी नेपथ्यरचना झाल्यानंतर मग केंद्र सरकारने काश्मीरबाबतचा निर्णय जाहीर केला.