कर्नाटक सरकारने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले, सीमा विकास प्राधिकरणासाठी १०० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:17 AM2023-02-04T07:17:34+5:302023-02-04T07:18:01+5:30
Maharashtra Vs Karnataka: कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला ३१ मार्चपूर्वी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा करून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे.
बंगळुरू : कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला ३१ मार्चपूर्वी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा करून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. सीमा भागाला विकासाची नितांत गरज आहे. शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कन्नडच्या प्रचारासाठी हा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
या आघाड्यांवर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गुरुवारी येथे कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने ‘गदीनादा चेतना’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, “आधीच प्राधिकरणाला २५ कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि आणखी १०० कोटींची तरतूद पुढील अर्थसंकल्पात केली जाईल. सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचे प्रश्नही सोडवले पाहिजेत आणि सीमेपलीकडे राहणाऱ्या कन्नडिगांचे प्रश्नही
सोडवले पाहिजेत.”
वादावर म्हणाले...
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा जेव्हा भाषिक धर्तीवर प्रदेश तयार केले जातात तेव्हा मतभेद वाढतात. मात्र, सर्व मतभेद विसरून सौहार्दपूर्ण जगणे महत्त्वाचे आहे. सीमाभागातील अनेक कन्नडिगांसाठी मात्र तसे झाले नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर कंबार, कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेकर उपस्थित होते.