जातिभेदाला कंटाळलेल्या हरयाणातल्या १०० दलित कुटुंबांनी स्वीकारला इस्लाम
By Admin | Published: August 10, 2015 03:11 PM2015-08-10T15:11:03+5:302015-08-10T15:11:03+5:30
उच्च जातीच्या गावक-यांकडून होणा-या छळाला कंटाळून हरयाणातल्या हिस्सारमधल्या सुमारे १०० दलित कुटुंबांनी इस्लामचा स्वीकार केल्याचे वृत्त आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - उच्च जातीच्या गावक-यांकडून होणा-या छळाला कंटाळून हरयाणातल्या हिस्सारमधल्या सुमारे १०० दलित कुटुंबांनी इस्लामचा स्वीकार केल्याचे वृत्त आहे. गेली तीन वर्षे धरणे, निदर्शने, मुख्यमंत्र्यांना निवेदने आदी मार्ग स्वीकारल्यावर आता मुस्लीम समाज तरी आपल्या सहाय्याला धावून येईल अशी अपेक्षा बाळगत या कुटुंबांनी शनिवारी जंतर मंतर येथे इस्लाम स्लीकारल्याचे सांगितले.
आमच्या गावातील जाट हे वरच्या जातीचे लोक आम्हाला कस्पटासमान लेखतात. त्यामुळे अशा धर्मात राहण्याची गरज असा प्रश्न यापैकी एकाने केला. जिल्हा प्रशासनही आमच्या तक्रारींची दखल घेत नसल्याचंही त्याने सांगितले.
हिस्सारमधल्या भगाना येथील हे गावकरी असून त्यांनी भगाना कांड संघर्ष समिती स्थापन केली आणि तीन वर्षांपासून लढा दिला. राज्य सरकारनं कबूल केलेली जमीन द्यावी, उच्च जातीच्या लोकांनी त्रास देऊ नये, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी, तसेच दलितांविरोधात जाटांनी केलेल्या अत्याचारांना उजेचात आणावं व न्याय द्यावा . या त्यांच्या मागण्या होत्या.
मात्र, तीन वर्षांच्या प्रयत्नांनतर अपयश पदरी आल्यानंतर इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतल्या कुतुब मिनार मशिदीतल्या मौलाना अब्दुल हनिफ यांनी धर्मांतराची प्रक्रिया केल्याचेही संघर्ष समितीचे अध्यक्ष विरेंद्र बगोरीया यांनी सांगितले.
भूपिंदरसिंग हुडा यांच्या काँग्रेस सरकारकडून आम्हाला कुठलीही आशा नव्हती परंतु मनोहरलाल खट्टर यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनंदेखील साफ निराशा केल्याची खंत बगोरीया यांनी व्यक्त केली.