आंदोलनास १०० दिवस झाले पूर्ण; शेतकऱ्यांचा हरयाणात रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:22 AM2021-03-07T06:22:31+5:302021-03-07T06:22:37+5:30
सकाळी ११ वा. सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालले. ‘संयुक्त किसान माेर्चा’च्या वतीने रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते.
चंदीगड/नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर पुकारलेल्या आंदोलनास शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शेतकऱ्यांनी हरयाणातील कुंडली-मनेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेसवेवर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला.
सकाळी ११ वा. सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालले. ‘संयुक्त किसान माेर्चा’च्या वतीने रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहने केएमपी एक्स्प्रेसवेवरून चालू दिली जाणार नाहीत, असे भारतीय किसान युनियनचे (दाकौंडा) सरचिटणीस जगमोहनसिंग यांनी सकाळीच जाहीर केले होते. सोनिपत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅल्या रस्त्याच्या मधोमध पार्क करून अडथळा निर्माण केला. आंदोलनात महिलाही सहभागी होत्या.
ज्यांची मुले सीमेवर लढताहेत त्यांच्या वाटेवर ठोकले खिळे; राहुल गांधी यांची टीका
n ज्यांची मुले देशाच्या सीमांवर स्वत:चे प्राण धोक्यात घालून लढत आहेत, त्यांच्या मार्गात दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने खिळे ठोकले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केले. त्यात त्यांनी पुढे म्हटले की, अन्नदाता आपला हक्क मागत आहे आणि सरकार त्याच्यावर अत्याचार करीत आहे.
n काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांच्या संघर्षाचे, हक्काच्या लढाईचे १०० दिवस पूर्ण. अन्नदात्याच्या सन्मानाचे, गांधीजी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचे शंभर दिवस पूर्ण.