१०० डॉक्टरांचे राजीनामे; देशभर सोमवारी काम बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 03:12 AM2019-06-15T03:12:35+5:302019-06-15T03:13:22+5:30
कोलकात्यातील आंदोलनाचे लोण सर्वत्र : आरोग्यसेवेवर परिणाम
कोलकाता/नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांपूर्वी रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी एका डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात शुक्रवारी सहभागी झाले. आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत.
डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत प. बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. सरकारच्या निषेधार्थ तब्बल १00 सरकारी वरिष्ठ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर तोडगा काढावा, असे कोलकाता हायकोर्टाने बंगाल सरकारला सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सरकारी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, डॉक्टर आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान, या आंदोलनामागे भाजप व डावे पक्ष असल्याचा आणि बाहेरचे लोक यात घुसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी तेथील डॉक्टरांची मागणी आहे. याखेरीज रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा डॉक्टरांना पाहण्यास बॅनर्जी यांनी यावे व या हल्ल्याचा निषेध करावा, अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे. हल्लानंतर निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांनी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, मुंबईतील डॉक्टरांनी डोक्यावर पांढरी पट्टी बांधून आंदोलन केले, तर दिल्लीतील डॉक्टरांनी हेल्मेट घातले होते. देशभर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.
ममता बॅनर्जीच जबाबदार
दिल्लीतील डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली आणि डॉक्टरांच्या आंदोलनात तोडगा काढण्याची, तसेच डॉक्टर व रुग्णालयांना सुरक्षा देण्याची मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी या आंदोलनाला ममता बॅनर्जी याच जबाबदार असल्याचा आरोप केला.
कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील केइएम रूग्णालयात डॉक्टरांनी रुग्णांप्रमाणे पट्ट्या बांधून आंदोलन केले.