खराब दारूगोळ्यावरील पैशांतून १०० तोफा खरेदी झाल्या असत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 06:16 AM2020-09-30T06:16:38+5:302020-09-30T06:17:01+5:30
सहा वर्षांत ९६० कोटी रुपये खर्च : संरक्षण मंत्रालयाला अंतर्गत अहवाल सादर
नवी दिल्ली : सरकारची मालकी असलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून गेल्या सहा वर्षांत खराब दर्जाचा दारूगोळा विकत घेण्यावर भारतीय लष्कराचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. या पैशांतून मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असा दावा संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात केला गेला आहे.
२०१४ ते २०२० दरम्यान आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने खराब दर्जाचा दारूगोळा पुरवला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ९६० कोटी म्हणजे एवढ्या पैशांमध्ये १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असे हा अहवाल म्हणतो.
बोर्डाचे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकारचे नियंत्रण असलेली उत्पादन संस्था आहे. देशात आॅर्डिनन्सच्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारूगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांत चालते. २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, १२५ एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
जीवितहानीही होते...
आॅर्डिनन्स फॅक्ट्रीने केलेल्या या खराब दर्जाच्या उत्पादनामुळे फक्त आर्थिक नुकसानच झाले नाही, तर दारूगोळ्याच्या सुमार दर्जामुळे जे अपघात झाले, त्यात जीवितहानीही झाल्याचे अहवालात नमूद आहे. ‘कोणावर जबाबदारी निश्चित करता येत नाही आणि खराब दर्जामुळे वारंवार अपघात घडतात. यामुळे सैनिक जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. सरासरी दर आठवड्याला एक अपघात होतो’, असेही अहवालात म्हटले आहे.