Corona Vaccination: लाल किल्ल्यावर भव्य तिरंगा फडकावून लस उत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:51 AM2021-10-22T06:51:17+5:302021-10-22T06:53:10+5:30
आता १०० कोटी डोस दिल्याच्या ऐतिहासिक क्षणी लाल किल्ल्यामध्ये हा तिरंगा राष्ट्रध्वज पुन्हा फडकविण्यात आला आहे. हा ध्वज २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे.
नवी दिल्ली : देशात नागरिकांना कोरोना लसीचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल दिल्लीतील लाल किल्ला येथे देशातील सर्वात मोठ्या आकाराचा, १४०० किलो वजनाचा व खादीच्या कापडापासून तयार केलेला तिरंगा ध्वज गुरुवारी फडकावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच देशभरात शासकीय कार्यालये, इमारतींवर दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
आता १०० कोटी डोस दिल्याच्या ऐतिहासिक क्षणी लाल किल्ल्यामध्ये हा तिरंगा राष्ट्रध्वज पुन्हा फडकविण्यात आला आहे. हा ध्वज २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे.
लसीकरण मोहिमेत ज्याक्षणी १०० कोटींचा टप्पा ओलांडला गेला, त्यानंतर त्याची घोषणा देशभरात विमाने, जहाजे, रेल्वे स्थानके. मेट्रो रेल्वे स्थानके अशा सर्व ठिकाणी करण्यात आली. स्पाईस जेट कंपनीने आपल्या एका विमानावर १०० कोटी डोसच्या ऐतिहासिक क्षणाबद्दलचे घोषवाक्य चित्रित केले होते. त्या विमानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर व आरोग्यसेवकांचेही चित्र चितारण्यात आले होते. प्रख्यात गायक कैलाश खेर यांनी १०० कोटी डोसच्या क्षणाबद्दल गायलेल्या एका विशेष गाण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते रिलाँच करण्यात आले.