Medical Colleges: २०२७ पर्यंत १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये, केंद्राचा प्रस्ताव; ६० टक्के निधीही देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 07:02 AM2022-11-14T07:02:32+5:302022-11-14T07:03:08+5:30
Medical Colleges: जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून २०२७ सालापर्यंत देशभरात १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याच्या विचाराधीन आहे. या महाविद्यालयांमुळे देशातील आरोग्य क्षेत्राला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली : जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून २०२७ सालापर्यंत देशभरात १०० नवीन वैद्यकीयमहाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याच्या विचाराधीन आहे. या महाविद्यालयांमुळे देशातील आरोग्य क्षेत्राला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने एक योजना अमलात आणली आहे. तिच्या चौथ्या टप्प्यात देशभरात १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी ३२५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्aयातील ६० टक्के निधी केंद्र सरकार व ४० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. ईशान्य भारतातील राज्ये व विशेष दर्जा असलेल्या राज्यांमध्ये या योजनेकरिता केंद्राकडून ९० टक्के व राज्याकडून १० टक्के रक्कम दिली जाईल.
या योजनेच्या आधीच्या तीन टप्प्यांत देशात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार होती. त्यातील ९३ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. इतर महाविद्यालयांचे बांधकाम काही कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
महाविद्यालय नसलेल्या जिल्ह्यांसाठी योजना
n ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या प्रत्येकी १० लाखांपेक्षा अधिक आहे व जिथे खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा १०० जिल्ह्यांमध्ये १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.
n केंद्र सरकारच्या योजनेच्या आधीच्या तीन टप्प्यांत मंजूर झालेल्या १५७ वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून नर्सिंग महाविद्यालयेही सुरू करण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक नर्सिंग महाविद्यालयाकरिता केंद्र सरकार १० कोटींचा निधी देणार आहे.