बापरे...! आठ वर्षांच्या मुलीच्या डोक्यात सापडले 100 जंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 05:48 PM2018-07-25T17:48:47+5:302018-07-25T17:49:42+5:30
कधी कधी आपण आपल्या नकळत अशा काही गोष्टी करून जातो. आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. बऱ्याचदा आपल्यालाही समजत नाही की आपण काय केलं आहे.
नवी दिल्ली : कधी कधी आपण आपल्या नकळत अशा काही गोष्टी करून जातो. आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. बऱ्याचदा आपल्यालाही समजत नाही की आपण काय केलं आहे. असाच काहीसा प्रकार दिल्लीमध्ये घडला असून या प्रकाराने चक्क डॉक्टरांनाही काही सुचेनासं झालं आहे.
एका आठ वर्षांच्या मुलीच्या डोक्यातून डॉक्टरांनी 100 जंत (टेपवर्म) बाहेर काढले आहेत. ही घटना दिल्लीमध्ये घडली असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकारामुळे डॉक्टर्सही हैराण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या मुलीला डोकेदुखीचा त्रास होत असून तिला फिट्सही येत होत्या.
डॉक्टरांनी काही तपासण्या आणि औषधं सुरू केली पण त्याने काही विशेष फरक पडत नव्हता. कालांतराने तिचं वजनही 20 किलोनं वाढलं तसेच तिला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. तिचा वाढता त्रास पाहून डॉक्टरांनी तिची सिटी स्कॅन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमिनच हादरली. तिच्या डोक्यात असणाऱ्या तब्बल 100 पेक्षा अधिक जंतांमुळे तिच्या मेंदूला सूज आली होती.
रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी लगेचच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करून डॉक्टरांनी तिच्या डोक्यातून तब्बल 100 हून अधिक जंत बाहेर काढले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, या मुलीनं जंत (टेपवर्म) असलेला पदार्थ खाल्ला होता. त्यामुळे त्या पदार्थातील जंत तिच्या रक्तातून मज्जासंस्थेत गेला आणि तिथूनच तो मेंदुपर्यंत पोहोचला. तिथेच त्या एका जंताने अंडी घातली आणि त्यातूनच 100 जंत तयार झाले.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पोटात होणाऱ्या जंताकडे आपण विशेष लक्ष देत नाही. पण, हे दुर्लक्ष करणंही जिवावर बेतू शकतं. कारण जर जंत मज्जासंस्थेपर्यंत पोहोचले तर मेंदूंच्या पेशी, त्वचा, डोळे यांच्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.