'तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये होणार सामील'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:21 AM2019-03-27T11:21:32+5:302019-03-27T11:26:24+5:30
अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे.
कोलकाता - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. यावेळची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. अर्जुन सिंह यांनी खुद्द तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आमच्या संपर्कात आहेत. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. काही आमदार निवडणुकीपूर्वी आणि काही निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार असल्याचे अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या भाटपुरी मतदार संघातून आमदार राहिलेले अर्जुन सिंह यांचे उत्तर कोलकातापासून नादिया भागात वर्चस्व आहे. आपल्या स्थानिक संपर्कामुळे अर्जुन सिंह आगामी काळात तृणमूल काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकतात, असंही समजते.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ठेवलेले आहे. यासाठी भाजपकडून पूर्ण तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालमधील ४० लोकसभा जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे.