100 वर्षीय वृद्धेला मुलाने काढलं घराबाहेर, 85 वर्षीय मुलीने दिला आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 08:55 AM2017-11-06T08:55:23+5:302017-11-06T08:57:03+5:30
चारबाग रेल्वे स्टेशनवर एक 100 वर्षीय महिला एका एनजीओला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती.
लखनऊ- चारबाग रेल्वे स्टेशनवर एक 100 वर्षीय महिला एका एनजीओला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. ऑक्टोबरमध्ये मुलाने 100 वर्षीय आईला घराबाहेर काढलं होतं. वृद्धांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओला ही महिला सापडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा तपासकरून त्या महिलेला राहण्यासाठी जागा मिळवून दिली. या 100 वर्षीय महिलेचा आसरा अजून कोणी नाही तर त्यांची 85 वर्षीय मुलगी झाली.
1 ऑक्टोबर रोजी एनजीओने त्या महिलेला बलरामपूर हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांची ओळखही त्या सांगू शकत नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये 15 दिवस उपचार केल्यानंतर त्यांनी त्यांची ओळख सांगितली. चंपा असं त्यांचं नाव असून त्या वाराणसीच्या आहेत.
वृद्ध महिलेचं फक्त नाव समजलं होतं. त्यापलिकडे त्यांची काहीही ओळख समजली नव्हती. म्हणूनच एनजीओने सोशल मीडिया आणि रेडिओच्या माध्यमातून महिलेच्या घरच्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लखनऊमध्ये राहणाऱ्या पुष्पा या त्यांच्या मुलीशी संपर्क साधला. चंपा यांची मुलगी पुष्पा लखनऊच्या दलिगंजमध्ये राहणारी आहे.
शनिवारी पुष्पा त्यांचा मुलगा मुकेशसह त्यांच्या आईला भेटण्यासाठी बलरामपूर हॉस्पिटलमध्ये पोहचल्या. आईची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर मुकेशने मुद्दाम मामाला फोन केला आणि आजीबरोबर बोलायचं असल्याचं सांगितलं. पण चंपा यांच्या मुलाने पीडित वृद्ध महिला आजारी असून ती कोणाशी बोलू शकत नसल्याचा बनाव केला.
मामाचा खोटारडे पणा उघड करण्यासाठी मुकेशने हॉस्पिटलमध्ये असलेल्या आजीचा व्हिडीओ तयार करून तो मामाला पाठवला. चंपा यांच्या मुलाने त्यांच्याशी नातं तोडत त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं होतं. एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर 100 वर्षीय पुष्पा यांना त्यांच्या 85 वर्षीय मुलीने आसरा दिला.