कॅन्सरविरोधातील लढाईत ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होणार 1000 जैन साध्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:28 AM2022-09-22T07:28:48+5:302022-09-22T07:31:31+5:30
२२० साध्वींनी स्क्रीनिंग करून घेतली
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : कॅन्सर विरोधातील लढाईमध्ये जैन समाजाने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी १००० जैन साध्वी ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होणार आहेत. धर्मगुरु व विविध जैन संघ, अहमदाबादच्या सहकाऱ्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. अहमदाबादेत २२० साध्वींच्या स्क्रीनिंगमध्ये चार चाचण्यांत ब्रेस्ट कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आढळली आहेत. शहरातील १००० साध्वी स्क्रीनिंग करणार आहेत. आंबावाडी जैन संघ, अहमदाबादपासून स्क्रीनिंगची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचे प्रणेते बहुचर्चित कॅन्सर सर्जन डॉ. मुकेश बावीशी आहेत. त्यांनी आजवर १२ जैन साध्वींची ब्रेस्ट सर्जरी केलेली आहे.
डॉ. बावीशी यांनी १७० जैन संघाची प्रमुख संस्था जैन महासंघाचे प्रमुख प्रवीणभाई शाह यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनी परवानगी दिली. डॉ. बावीशी यांचे म्हणणे आहे की, देशात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्यामुळे हे महत्त्वाचे आहे. अविवाहित, निसंतान किंवा बाळांना स्तनपान न करणाऱ्या महिलांना याचा जास्त धोका आहे. त्यासाठी याची वेळोवेळी तपासणी गरजेची आहे.
असा आला विचार, पतीनेही दिली साथ
ही मोहीम सुरू करण्यात डॉ. मुकेश यांच्या पत्नी डॉ. विदुला बावीशी यांची महत्त्वाची भूमिका आहे. डॉ. विदुला सांगतात की, माझ्या माहितीतील साध्वीजींचे या आजाराने झुंजत असताना निधन झाले. तेव्हाच मी ठरवले की, एकाही साध्वीजी महाराजांना याचा त्रास होता कामा नये, यासाठी काही तरी केले पाहिजे. जुलै महिन्यात माझ्या पतीच्या सहकाऱ्याने संपूर्ण गुजरातमध्ये जैन साध्वीजी महाराजांसाठी विशेष स्क्रीनिंग मेमोग्राफी टेस्ट सुरू केली. रोटरी क्लब ऑफ अहमदाबाद मॅजेस्टी, एवरोन हॉस्पिटल, एआयएमएस हॉस्पिटल व निरामई संस्थानच्या संयुक्त उपक्रम व विविध जैन संघाच्या मदतीने संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जाईल.
प्रवचनातूनही करू शकतात जागरूकता
श्रीमद् विजय राजयशसूरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, रोगनिदान करणे धर्माविरुद्ध नाही. सामान्यत: जैन साधू महाराज किंवा साध्वीजी कधीही तपासणी करीत नाहीत. त्यांच्या प्रमुख गुरुवर्यांच्या आदेशानंतरच ते तपासणीसाठी तयार होतात. आंबावाडी जैन संघात ३९ साध्वीजी महाराजांच्या स्क्रीनिंगदरम्यान एक साध्वीजी महाराजांमध्ये या आजाराचे लक्षण आढळले. सर्वसामान्यांपर्यंत या धोकादायक आजाराची माहिती पोहोचावी, या उद्देशाने साध्वीजी महाराजांनी परवानगी घेऊन प्रवचनद्वारे याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
बॅचचे सहकारी डॉक्टरही सहयोग देणार
डॉ. बावीशी यांनी सांगितले की, आतापर्यंत २२० साध्वींची अत्याधुनिक थर्मो मेमोग्राफी कॅमेरातून स्क्रीनिंग करण्यात आली. यातून भविष्यात आकार घेणाऱ्या / विकसित होणाऱ्या गाठीचे चिन्ह पाहिले जाऊ शकते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या बॅचच्या महिला रोगतज्ज्ञ डॉक्टर राज्यातील विविध भागांमध्ये सेवा देत आहेत. राज्यात पुढील वर्षीच्या जूनपर्यंत २००० पेक्षा जास्त साध्वींची परवानगी घेऊन स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.