नौदलात अग्निवीर होण्यासाठी १० हजार मुली तयार; हवाई दलाकडे ७.५० लाख अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:55 AM2022-07-06T05:55:01+5:302022-07-06T05:55:17+5:30
अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलाला २९ जूनपर्यंत ७.५० लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
नवी दिल्ली : लष्करात सरकारच्या नवी भरती योजना ‘अग्निपथ’बद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तिन्ही सेना दलातील तरुणांना ‘अग्निवीर’ बनायचे असताना तरुणीही यात मागे नाहीत. योजना सुरू झाल्यापासून नौदलाकडे तरुणींचे तब्बल १० हजारपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे गरज लागल्यास या तरुणींना सैनिकांना युद्धनौकांवरही तैनात केले जाणार आहे. नौदलासाठी ३० जुलैपर्यंत भरती प्रक्रिया चालेल.
हवाई दलाकडे ७.५० लाख अर्ज
अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलाला २९ जूनपर्यंत ७.५० लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. हवाई दलाची नोंदणी मंगळवारी बंद झाली. हवाई दलासाठी २४ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. २६ जूनपर्यंत म्हणजे अवघ्या ३ दिवसांत ५६,९६० अर्ज प्राप्त झाले, तर २७ जूनपर्यंत ९४,२८१ अर्ज प्राप्त झाल्याचे भारतीय हवाई दलाने ट्वीटरद्वारे कळविले आहे.
१९९० दशकात लष्कराची दारे महिलांसाठी खुली झाली. २०१९-२०मध्ये लष्करातील अन्य पदांवर महिलांची भरती सुरू झाली.