१०१ वर्षांच्या भारतीय आजीबार्इंनी जिंकली धावण्याची शर्यत
By admin | Published: April 25, 2017 12:49 AM2017-04-25T00:49:49+5:302017-04-25T00:49:49+5:30
येथे सुरु असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स गेम्स’ या वृद्धांसाठीच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये मन कौर या १०१ वर्षांच्या भारतीय आजीबाईंनी १०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली.
आॅकलंड : येथे सुरु असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स गेम्स’ या वृद्धांसाठीच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये मन कौर या १०१ वर्षांच्या भारतीय आजीबाईंनी १०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली. शर्यत पूर्ण केल्यावर त्यांनी केलेल्या ‘व्हिक्टरी डान्स’ने तर स्टेडियममदील मोजक्या प्रक्षकांची मनेही जिंकली.
मन कौर यांनी १०० मीटर धावण्यासाठी एक मिनिट १४ सेकंद एवढा वेळ घेतला. जमैकाच्या उसेन बोल्टने सन २००९ मध्ये प्रस्थापित केलेल्या जागतिक विक्रमाहून या आजीबाईंना ६४.४२ सेकंदे जास्त लागली. वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून मन कौर यांनी जिंकलेले हे १७ वे सुवर्णपदक
होते.
बुटक्या अंगकाठीच्या मनकौर यांनी धावण्याची सुरुवात जोरात केली, पण शेवटी ‘फिनिशिंग लाईन’वर येताना त्या प्रेक्षकांकडे पाहात रेंगाळत आल्या. अर्थात विजय निश्चित असल्यान त्यांना घाई करण्याचे तसे कारणही नव्हते. कारण १०० किंवा त्याहून जास्त वर्षे वयाच्या स्पर्धकांसाठीच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याच एकमेव स्पर्धक होत्या!
न्यूझीलंडमधील वृत्तपत्रांनी ‘चंदीगडचे आश्चर्य’ अशा मथळयांनी कौतुक केलेल्या मन कौर यांचा भरच मुळात स्पर्धेत भाग घेण्यावर होता, घड्याळ््याचे काटे त्यांच्यासाठी दुय्यम होते.
आॅकलंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धांमध्ये एकूण २४,९०५ स्पर्धक भाग घेत असले तरी वयाची शंभरी पार केलेल्या मन कौर या एकमेव स्पर्धक आहेत. वयापुढे हार न मानण्याची या स्पर्धकांची जिद्द इतरांना आणि खास करून तरुणांना नक्कीच स्फूर्तिदायक आहे.
स्पर्धेच्या वेळी आई गव्हांकुराचा रस आणि ताक अशा सक्त डाएटवर असते, असे मन कौर यांचे चिरंजीव गौरव सिंग यांनी ‘इंडियन वीकएंडर’ वृत्तपत्रास सांगितले. (वृत्तसंस्था)
आणखीही दोघे विक्रमवीर-
वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही खेळांची मैदाने गाजविणाऱ्या मन कौर या एकमेव स्पर्धक नाहीत.
शंभरी पार केलेल्या स्पर्धकांचा १०० मीटर धावण्याचा जागतिक विक्रम जपानचे १०५ वर्षांचे हिडेकिची मियाझाकी यांच्या नावावर आहे. त्यांनी ही स्पर्धा २९,८३ सेकंदात जिंकली होती व तेव्हापासून ते ‘गोल्डन बोल्ट’ म्हणून ओळखले जातात.
४रॉबर्ट मारचंद या फ्रेंच नागरिकाने वयाच्या १०५ व्या वर्षी एका तासात २२.५४७ किमी (१४.०१ मैल) सायकल चालवून केलेला विक्रमही अद्याप अबाधित आहे.
२० पदकांचे लक्ष्य-
मन कौर यांच्या वयाची सत्तरी पार केलेल्या मुलाने, गौरव सिंगने आधी या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. नंतर त्याने आईचेही मन वळविले आणि खेळाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या मन कौर वयाच्या ९३ व्या वर्षी सर्वप्रथम मैदानात उतरल्या. तेव्हापासून त्यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांची संख्या मायकेल फेल्प्सलाही हेवा वाटावा अशी आहे.