तिरुपतीच्या १०१ वर्षांच्या वृद्धेची कोरोना संसर्गावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:56 AM2020-07-27T05:56:20+5:302020-07-27T05:56:37+5:30
मनाने खंबीर असल्यानेच मिळाले यश
तिरुपती : आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात दाखल झालेली १०१ वर्षे वयाची महिला कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरी झाली आहे. आपल्या घरी जाण्याचा मार्गही तिने रुग्णवाहिका चालकाला नीट समजावून सांगितला.
मंगम्मा असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर. राम यांनी सांगितले की, मंगम्मा मानसिकदृष्ट्या अत्यंत कणखर असून, त्यामुळेच त्या कोरोनावर मात करू शकल्या. कोरोनाच्या संसर्गाची मध्यम स्वरूपाची लक्षणे व कफाचा त्रास होत असलेल्या मंगम्मा यांना १४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घरातील इतर सर्व सदस्यांची चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.
मंगम्मा यांना कोरोना वॉर्डात दाखल केल्यानंतर त्यांच्या सेवेची जबाबदारी मंजुळा नावाच्या आरोग्यसेविकेकडे सोपविली गेली. मंजुळा यांनी सांगितले की, मंगम्मा यांनी कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही तक्रार केली नाही. मंगम्मा यांना वृद्धापकाळामुळे व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो. मात्र त्या मनाने अतिशय खंबीर आहेत. नातेवाइकांनी नीट पत्ता दिलेला नसल्याने मंगम्मा यांना रुग्णालयातून घरी नेताना थोडी अडचण झाली. त्यावेळी मंगम्मा यांनीच तिरुपतीतील येरमित्ता भागातील घरापर्यंत कसे जायचे तो रस्ता चालकाला समजावून सांगितला.
तिरुपती हे तीर्थक्षेत्र ज्या चित्तूर जिल्ह्यात आहे, तिथे सध्या २८९५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी या जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ३०० नवे रुग्ण आढळून आले. आंध्र प्रदेशमध्ये ४४,४३१ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
उच्चांक मोडला
श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयातून याआधी ८९ वर्षे वयाचे गृहस्थ कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले होते. या रुग्णालयात ९३ वर्षे वयाच्या आणखी एका कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.