यंदा 'वरुणराजा' धुवांधार बरसणार; देशात १०२ टक्के पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:39 PM2020-06-01T19:39:57+5:302020-06-01T19:40:28+5:30
मॉन्सूनचा हा अंदाज ६ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून..
पुणे : देशात पावसाच्या चार महिन्यांत पाऊसमान सर्वसाधारण राहणार असून, संपूर्ण देशात १०२ टक्के पाऊस पडणार असल्याचा दुसर्या टप्प्यातील अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केला. त्यात ४ टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून सर्वत्र चांगला होण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत विभागावार किती पाऊस होईल, याचा अंदाज व्यक्त केला असून, पूर्व भारत वगळता सर्वत्र १०० टक्क्यांहून अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यात संपूर्ण देशात १०३ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉन्सूनचा हा अंदाज ६ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून व्यक्त केला जातो.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या मॉन्सून मिशन मॉडेलद्वारे मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे. या मॉडेलनुसार चार महिन्यांत १०४ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार देशात ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता केवळ ५ टक्के आहे.सर्वसाधारणपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता (९० ते ९६ टक्के) १५ टक्केआहे. तसेच ९६ ते १०४ टक्के पावसाची शक्यता ४१ टक्के आहे.सर्वसाधारणपेक्षा अधिक (१०४ ते ११० टक्के) पावसाची शक्यता २५ टक्के आहे. आणि ११० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता १४ टक्के आहे. हे पाहता पाऊस कमी होण्याची शक्यता केवळ ५ टक्के आहे. याउलट सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता ४१ टक्के इतकी आहे.जुलै महिन्यात संपूर्ण देशात १०३ टक्के पावसाची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये सर्वसाधारणापेक्षा थोडा कमी ९७ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात मॉडेलनुसार ९ टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.
.........
संपूर्ण देशात १०२ टक्के (४ टक्के कमी-अधिक)
उत्तर पश्चिम भारत १०७ टक्के (८ टक्के कमी-अधिक)
मध्य भारत १०३ टक्के
दक्षिण भारत १०२ टक्के
उत्तर पूर्व भारत ९६ टक्के
........
संपूर्ण भारतात जुलै महिन्यात १०३ टक्के पाऊस
ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पाऊस (९ टक्के कमी-अधिक)