१0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू
By admin | Published: April 14, 2016 06:23 PM2016-04-14T18:23:32+5:302016-04-14T19:45:11+5:30
पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १४ - पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या जवानाच्या १0३ वर्षे वयाच्या मुलीला पुन्हा पेन्शन सुरू करावे, असा आदेश लष्करी दल लवादाने दिला आहे. या महिलेला २00७ पर्यंत पेन्शन मिळत होते. मात्र तिच्या पतीच्या निधनानंतर तिला ते पेन्शन मिळू लागल्याने वडिलांच्या निधनामुळे मिळणारे पेन्शन बंद करण्यात आले होते.
सिरी कुमारी गौरांग या महिलेचे वडिल पहिल्या महायुद्धात ८ मार्च १९१६ रोजी मरण पावले होते. तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. तिला ९ मार्चपासून १९१६ पासून पेन्शन सुरू करण्यात यावे, असा निर्णय वडिलांच्या मृत्यूनंतर झाला होता. काही वर्षांनी तिचा लष्करातील जवानाशी विवाह झाला. तो सप्टेंबर १९६४ मध्ये मरण पावला. तेव्हापासून पतीच्या निधनानंतरचेही पेन्शन सुरू झाले. तेव्हापासून २00७ पर्यंत तिला याप्रकारे दोन पेन्शनची रक्कम मिळत होती.
तिला दोन पेन्शनची रक्कम मिळत असल्याचे २00७ साली पेन्शन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली. तसेच त्या कारणास्तव आधीच्या वर्षांत दिलेली पाच लाखांची रक्कम तिथे परत करावी, असा आदेश तिला पेन्शन विभागाने दिला. एवढेच नव्हे, तर नवऱ्याच्या निधनामुळे मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ती रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली. ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये होती.
पेन्शन विभागाच्या या निर्णयाला या महिलेने लवादासमोर आव्हान दिले होते. त्यात केंद्र सरकार आणि लष्कर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. तिच्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर तिला २00७ पासून थांबवलेली पेन्शनची सर्व रक्कम सुरू करावी, यापुढे ती कायम ठेवावी तसेच कापलेली रक्कम १0 टक्के व्याजाने परत करावी, असा आदेश लवादाने दिला आहे. तसेचआलेल्या खर्चापोटी केंद्र सरकार आणि लष्कर यांनी मिळून एक लाख रुपये तिला द्यावेत, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळत असलेली पेन्शन सुरू झाली, तेव्हा ती आयुष्यभरासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते, असे त्या महिलेने कागदपत्रांद्वारे सिद्ध केले होते. नवऱ्याच्या निधनामुळे पेन्शनचा आणि या पेन्शनचा संबंध नसल्याचे लवादाने स्पष्ट केले.
त्या महिलेची रक्कम थांबवणाऱ्या व्यक्तींच्या वेतनातून एक लाखांची रक्कम कापण्याबाबतचा निर्णय प्रतिवादी म्हणजेच केंद्र सरकार व लष्कर यांनी घ्यावा, असेही लवादाने म्हटले आहे.