१० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:34 AM2022-02-24T07:34:34+5:302022-02-24T07:35:28+5:30
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तसेच अन्य शिक्षण मंडळातर्फे १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.
नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तसेच अन्य शिक्षण मंडळातर्फे १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याला विरोध दर्शविणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. अशा याचिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये खोटी आशा तसेच गोंधळ निर्माण होतो असे सुनावले.
कोर्टाने न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, अनेक राज्य शिक्षण मंडळांनी १० वी, १२ वी च्या परीक्षांच्या तारखा ही जाहीर केलेल्या नाहीत. त्याआधीच परीक्षा ऑफलाईन घेण्यास विरोध करणारी याचिका सादर करणे चुकीचे आहे. विद्यार्थी परीक्षांसाठी खूप तयारी करत असतात. त्यांना खोटी आशा दाखवू नका. या परीक्षांच्या स्वरूपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्णय घेऊ द्या. तो चुकीचा वाटल्यास त्याला आव्हान देता येईल.
कोरोनामुळे गेल्यावर्षी परीक्षा ऑनलाईन होण्यासंदर्भात कोर्टाने होकार दिला होता. मात्र असा आदेश म्हणजे नियम होऊ शकत नाही. मात्र आताच्या स्थितीत ऑफलाईनला विरोध करणाऱ्या याचिका निरर्थक ठरतात. २०२१ सालासाठीच्या एमबीबीएसची प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या सर्व बाबी याचिकादारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालाव्यात. तसेच सीबीएसई व अन्य शिक्षण मंडळाच्या १० वी व १२वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेऊ नयेत असा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला.
काही परीक्षांचे निकाल लागले नाहीत
याचिकादारांच्या वकिलांनी सांगितले की, सीबीएसईने पहिल्या सत्राच्या परीक्षा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतल्या होत्या. त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. विशिष्ट मुदतीत निकाल जाहीर करण्याचे बंधन घालणे आवश्यक आहे.