दहावीच्या मुलाने ‘भावी अधिकाऱ्यां’ना गंडविले; महागडे शौक पूर्ण करण्यासाठी पेपर लीकच्या नावाने केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 06:09 AM2024-08-06T06:09:47+5:302024-08-06T06:10:11+5:30
सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) तुषार सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमधील १०वीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने ‘टेलीग्राम’वर एक चॅनेल तयार केला.
इंदूर : मध्य प्रदेश नागरी सेवा परीक्षेतील पेपर लीक झाल्याचा दावा करत राजस्थानमधील दहावीच्या विद्यार्थ्याने महागडे शौक पूर्ण करण्यासाठी अनेक उमेदवारांची फसवणूक केली आहे.
सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) तुषार सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमधील १०वीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने ‘टेलीग्राम’वर एक चॅनेल तयार केला. त्यावर त्याने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या दि. २३ जूनच्या राज्यसेवा परीक्षेच्या प्राथमिक फेरीचे पेपर प्रत्येकी २,५०० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा केला होता. यात त्याने यूपीआय पेमेंट करण्यासाठी एक क्यूआर कोडही दिला होता.
नेमके काय केले?
nसिंह म्हणाले की, राज्य सेवा परीक्षेचा पेपर मिळविण्याच्या लालसेने या क्यूआर कोडद्वारे कोणी पेमेंट करताच, विद्यार्थी त्या खरेदी करणाऱ्याचा मोबाइल नंबर ब्लॉक करत असे. या पद्धतीने फसवणूक करून विद्यार्थ्याने अनेक उमेदवारांची फसवणूक केली.
nसर्वात आश्वर्याची बाब म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे राज्यसेवा परीक्षेचा पेपरच नव्हता आणि त्याने फसवणूक करण्यासाठी पेपर लीक झाल्याचा खोटा दावा केला.
फसवणूक कशी करायची यू-ट्यूबवर शिकला
एसीपी म्हणाले की, दहावीतील विद्यार्थ्याने यू-ट्यूबवर ऑनलाइन फसवणूक कशी करायची याच्या पद्धती शिकून घेतल्या.
लोकांना फसविलेल्या पैशातून त्याला महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा छंद पूर्ण करायचा होता.
जूनमध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात विद्यार्थ्याला सीआरपीसी अंतर्गत नोटीस देण्यात आली असून, फसवणूक प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
विद्यार्थ्याने नीट फॉर्म विकण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती आणि या प्रकरणाचा तपास सीबीआय राजस्थान पोलिसांच्या मदतीने करत असल्याचे एसपींनी सांगितले.