१० वीची परीक्षा, १० मिनिटेच बाकी; अन् पोलिसांनी केला 'ग्रीन कॉरिडॉर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 08:16 AM2023-02-28T08:16:29+5:302023-02-28T08:17:15+5:30
कोलकाता पोलिसांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल
दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. आजोबांचे निधन झाल्यामुळे सर्व नातलग तिकडे गेल्यामुळे ती एकटीच निघाली होती. एकटी आणि परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अवघे १० मिनिटे शिल्लक असल्यामुळे ती टेन्शनमध्ये होती. रडायला लागली. गोंधळलेली ती रस्त्यावरच लोकांना मदतीची विनवणी करीत होती.
इतक्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचे तिच्याकडे लक्ष गेले, त्यानंतर त्या पोलिसाने जे काही केले त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये शनिवारी सकाळी हावडा ब्रिज ट्रॅफिक गार्डमध्ये तैनात इन्स्पेक्टर सौविक चक्रवर्ती हे राजा कटराजवळील स्ट्रँड रोडवर गस्तीवर होते. ११.२० च्या सुमारास शाळेच्या गणवेशातील मुलगी रडताना दिसली.
चक्रवर्ती यांनी मुलीला आपल्या अधिकृत वाहनात बसविले, वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधून ‘ग्रीन कॉरिडॉर’ची मागणी केली आणि पुढील १० मिनिटांत बरोबर ११.३० वाजता केंद्राचे गेट उघडण्यावेळीच तिला पोहोचविले आणि परीक्षेच्या शुभेच्छा देऊन पुन्हा आपल्या कामाला लागले. कोलकाता पोलिसांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल
झाली असून, अशा पोलिस कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्हाला सलाम अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.