खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:20 AM2024-05-11T11:20:35+5:302024-05-11T11:21:31+5:30
गुजरातमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने राजस्थानमध्ये स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल उघडलं. येथे गेल्या तीन वर्षांपासून तो लोकांवर उपचार करत होता.
राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने राजस्थानमध्ये स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल उघडलं. येथे गेल्या तीन वर्षांपासून तो लोकांवर उपचार करत होता. मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तेथे पोहोचले असता तो बनावट डॉक्टर फरार झाला. प्रशासनाने हॉस्पिटल सील केले आहे. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण डुंगरपूर जिल्ह्यातील सिमलवाडा ब्लॉकचे आहे. राजस्थान-गुजरातच्या पुनवाडा सीमेवर असलेले एक बनावट हॉस्पिटल शुक्रवारी सील करण्यात आलं आहे. एक गर्भवती महिला आणि आणखी एक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होते. कोरोनाच्या काळात सफाई कर्मचाऱ्याने हे हॉस्पिटल सुरू केलं होतं. जितेंद्र भगोरा हा तीन वर्षांपूर्वीपर्यंत गुजरातमधील अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी होता. तिथे झाडू मारता मारता तो डिलिव्हरी करायला आणि ड्रिप लावायला शिकला.
राजस्थान-गुजरात सीमेवर राजस्थानमधील पूनावाडा येथे एका सरकारी शिक्षकाचे घर भाड्याने घेतलं आणि स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल सुरू केले. येथे त्याने लोकांवर उपचार केले आणि गर्भवती महिलांची प्रसूती केली. मात्र डुंगरपूर जिल्हा व वैद्यकीय प्रशासनाला याची माहितीही नव्हती. हा प्रकार नुकताच उघडकीस आल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्काच बसला.
हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधंही सापडली आहेत. यामध्ये गर्भपात, स्लीप, डिलिव्हरी, बीएनएस, एनएस ड्रिप आणि बीपी इन्स्ट्रुमेंट यांचाही समावेश आहे. जितेंद्र भगोरा हा रोज डॉक्टरच्या वेशात हॉस्पिटलमध्ये येत असत. त्याची वागणूक डॉक्टरांसारखी होती.
गुजरातमधील अनेक खासगी हॉस्पिटलशी त्याचा संपर्क होता. तो गंभीर रुग्णांना त्या हॉस्पिटलमध्ये रेफर करत असे. त्या बदल्यात त्याला कमिशन मिळत असे. तो रुग्णांना हेवी स्टेरॉईड असलेलं औषध देत असे ज्यामुळे रुग्णांना तात्काळ आराम मिळत असे. त्यामुळे भोळे गावकरी त्यांना चांगले डॉक्टर समजू लागले आणि त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत. पण आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे.