१० पट वेगवान 5G चा धमाका आजपासून; पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी, अहमदाबादेत प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 06:28 AM2022-10-01T06:28:57+5:302022-10-01T06:29:28+5:30
आज 'इंडिया मोबाइल काँग्रेस'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी दूरसंचार सेवेचा औपचारिक शुभारंभ केला जाणार आहे.
नवी दिल्ली : १ ऑक्टोबर २०२२ रोजी 'इंडिया मोबाइल काँग्रेस'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी दूरसंचार सेवेचा औपचारिक शुभारंभ केला जाणार आहे. ही सेवा ४ जी तुलनेत १० पट वेगवान असणार आहे. यामुळे व्हिडीओ अजिबात न थांबता पाहणे शक्य होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय कॉलवरही आवाज खंडित न होता सलग ऐकू येणार आहे.
दिल्लीतील प्रगती मैदानावर १ ते ४ ऑक्टोबर या काळात इंडिया मोबाइल काँग्रेस'चे आयोजन केले आहे. 'इंडिया मोबाइल कॉंग्रेस हा दूरसंचार क्षेत्रातील सरकार समर्थित कार्यक्रम आहे. सेवा तूर्तास काही निवडक शहरांतच उपलब्ध असेल. काही वर्षांत तिचा विस्तार देशभर विस्तार केला आईल. १ ऑक्टोबर रोजी वाराणसी (उत्तर प्रदेश) आणि अहमदाबाद (गुजरात) येथे जिओच्या ५ जी सेवेस सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उद्घाटनाला उपस्थित असतील.
दिवाळीपर्यंत मुंबईतही
- केंद्र सरकारने अलीकडेच ५१,२३६ मेगा हर्टड ५ जी स्पेक्ट्रमचे वितरण दूरसंचार कंपन्यांना केले आहे. जिओने ८८,०७८ कोटी रुपयांचे, तर एअरटेलने ४३,०८४ कोटी रुपयांचे ५ जी स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
- प्राप्त माहितीनुसार, जिओ येत्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसह सर्व प्रमुख शहरांत ५ जी सेवा सुरु करणार आहे.
- डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात कंपनीचे ५ जी कव्हरेज असेल. एअरटेलही ऑक्टोबरमध्ये ५ जी सेवा सुरु करीत आहे.
- दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जीच्या तुलनेत ५ जी सेवेची गती १० पट अधिक असणार आहे. तसेच किंमत १० ते १५% अधिक असणार आहे.