निवडणूक रोख्यांतून भाजपला ११,५६२ कोटी; तृणमूलला ३,२१४ कोटी, काँग्रेसला २,८१८ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 05:52 AM2024-03-15T05:52:03+5:302024-03-15T05:52:11+5:30
स्टेट बॅंकेने माहिती दिल्यावर निवडणुक आयोगाकडून तपशील जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक राेख्यांतून भाजपला ११,५६२ काेटी; तृणमूलला ३,२१४ काेटी, काॅंग्रेसला २,८१८ काेटी रुपये मिळाल्याची माहिती निवडणूक आयाेगाने जाहीर केलेल्या एसबीआयच्या अहवालातून समाेर आली आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयने सादर केलेली निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाने गुरुवारी संकेतस्थळावर जाहीर केली. ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामल एंटरप्राइझेस, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शिअल डेव्हलपर्स या बड्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली होती. रोख्यांतून भाजप, काँग्रेससह विविध पक्षांना देणग्या मिळाल्या. एकूण रोख्यांमधून ४७ टक्के रक्कम भाजपला मिळाली असून, शिवसेनेला ३१६ कोटी मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोणकोणत्या पक्षांना मिळाली देणगी?
निवडणूक रोख्यांतून भाजप, काँग्रेस, अण्णाद्रमुक, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, तेलुगू देसम पक्ष, वायएसआर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल (यू), जनता दल (एस), राजद, आप, समाजवादी पक्ष, जम्मू-काश्मीर नॅशनल काॅन्फरन्स, बिजद, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतक आदी पक्षांनाही देणग्या मिळाल्या.