अटारीमधून पाकिस्तानमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होते ११ बांगलादेशी, ओलांडली उंच भिंत, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:44 PM2023-10-13T13:44:00+5:302023-10-13T13:45:15+5:30
India Pakistan Border: पंजाबमधील अटारी येथून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या ११ बांगलादेशींना बीएसएफने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन महिला आणि ३ मुलांचाही समावेश आहे.
पंजाबमधील अटारी येथून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या ११ बांगलादेशींना बीएसएफने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन महिला आणि ३ मुलांचाही समावेश आहे. हे बांगलादेशी नागरिक अटारी बॉर्डरवर असलेल्या इंटीग्रेटेड चेक पोस्टची उंच भिंत ओलांडून सीमारेषेजवळ पोहोचले होते. तसेच बीएसएफची नजर चुकवण्यासाठी लपून योग्य वेळेची वाट पाहत होते. या प्रयत्नात एका स्थानिकाने त्यांना मदत केली. तसेच त्या बदल्यात त्यांच्याकडून २५ हजार रुपये उकळले होते. या ११ जणांमध्ये एक गर्भवती महिलाही होती. दुर्दैवाने भिंत पार करत असताना तिचा गर्भपात झाला. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बीएसएफच्या उच्चपदस्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानाच जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांकडे आवश्यक असलेली वैध कागदपत्रे नव्हती. ते बुधवारी अमृतसर येथे आले. तिथून ते अटारी येथे पोहोचले. तिथे संध्याकाळी होणारा सोहळा पाहिल्यानंतर त्यांनी सीमा ओलांडण्यासाठी तेथील अंदाज घेतला. त्यावेळी एका स्थानिकाने त्यांना पाहिले. तसेच त्यांना विश्वासात घेत सीमा पार करण्यात त्यांना मदतीचं आश्वासन दिलं.
तसेच त्यासाठी त्याने या बांगलादेशींकडे प्रतिव्यक्ती २५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र एवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. तरीही त्यांनी या व्यक्तीला २५ हजार रुपये दिले. तसेच उर्वरित पैसे पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर नातेवाईकांच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर या व्यक्तीने कटरच्या माध्यमातून कुंपणाच्या काटेरी तारा कापून बांगालदेशांना सीमेपर्यंत पोहोचवले. तिथे त्यांना ११ फूट उंच असलेली भिंत पार केली. मात्र या प्रयत्नात बांगलादेशींमधील एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाला. तरीही हे ११ लोक पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत लपून बसले. अखेरीस कुणीतरी सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असल्याची कुणकूण बीएसएफच्या जवानांना लागली आणि त्यांनी या लोकांना ताब्यात घेतले.