नवी दिल्लीतील सामूहिक आत्महत्या : रजिस्टरमधून समोर आल्या या 10 धक्कादायक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 01:59 PM2018-07-02T13:59:11+5:302018-07-02T14:28:40+5:30
राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूमागील कोड अद्यापपर्यंत सुटू शकलेले नाही.
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूमागील कोड अद्यापपर्यंत सुटू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील 10 जणांचे मृतदेह हॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. तर एक मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी 10 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, त्या शेजारील खोलीतून पोलिसांनी दोन रेजिस्टर ताब्यात घेतले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये अलौकिक शक्ती, मोक्षप्राप्तीसाठी मृत्यू हाच एकमेव मार्ग, आत्मा आणि अध्यात्म यांचा परस्परांशी असलेला संबंध अशा स्वरुपाचा मजकूर आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रजिस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे की, ''रात्री एक वाजता जप सुरू करा. कापड आणि कापसाच्या मदतीनं मृत्यपूर्वीच आपले डोळे बंद करुन घ्या. मरताना जिवाची तडफड होईल,त्यामुळे हात बांधून ठेवावेत. हे कार्य गुरुवारी आणि शनिवारी करणं चांगले ठरेल''. दरम्यान या रजिस्टरमध्ये आणखी काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
या रजिस्टरमधील शेवटची नोंद ही 26 जूनला झाली आहे. 'आपण 30 जूनला देवाला भेटणार आहोत. देवाच्या भेटीसाठी आपण सर्व हात, पाय, तोंड पूर्णपणे बांधू,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आहे.
नेमका काय आहे रजिस्टरमधील मजकूर ?
1. काहीच दिसता कामा नये, अशा पद्धतीनं डोळ्यांवर योग्य पद्धतीनं पट्टी बांधवी. दोरीसोबत सुती साड्यांचाही वापर करावा.
2. सलग सात दिवस पूजा करावयाची आहे. मनानं आणि श्रद्धेनं ही पूजा करावी. पूजेदरम्यान जर घराबाहेरील एखादी व्यक्ती आली तर पूजा दुसऱ्या दिवशी करावी.
3. पूजेचं कार्य गुरुवारी किंवा रविवारी करावे.
4. वयोवृद्ध महिला उभी राहण्यास सक्षम नसल्यास, त्यांना वेगळ्या खोलीमध्ये नेऊन झोपवावे. दरम्यान, या घटनेत वयोवृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या महिलेचा मृतदेह हॉलशेजारील खोलीत आढळून आला.
5. कुटुंबातील सर्व सदस्यांचे विचार एकसारखेच असावेत. असे असल्यासच तुमचे पुढील कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होईल.
6. जेव्हा सर्वजण आत्महत्या करतील, त्यावेळेस खोलीमध्ये थोड्या प्रमाणात प्रकाश असावा.
7. हात बांधून झाल्यानंतर उर्वरित पट्ट्या डोळ्यांवर बांधव्यात.
8. तोंडदेखील पट्टी आणि रुमालानं बांधून घ्यावे.
9. कार्यादरम्यान जितकी चिकाटी आणि श्रद्धा दाखवली जाईल, याचे तेवढेच चांगले फळ मिळेल.
10. रात्री उशिरा 12 ते 1 वाजेदरम्यान कार्य करावे, त्यापूर्वी हवन करावे लागणार आहे.