११ सदोष विमानांवर उड्डाणबंदीचा निर्णय, दोन कंपन्यांना सरकारचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:45 AM2018-03-13T04:45:42+5:302018-03-13T04:45:42+5:30
ज्यात प्रॅट अॅण्ड व्हिटनी कंपनीची सदोष इंजिने बसविलेली आहेत अशा एअरबस-३२० निओ प्रकारच्या विमानांचा देशात प्रवासी वाहतुकीसाठी वापर बंद करण्याचा आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोमवारी दिला.
नवी दिल्ली : ज्यात प्रॅट अॅण्ड व्हिटनी कंपनीची सदोष इंजिने बसविलेली आहेत अशा एअरबस-३२० निओ प्रकारच्या विमानांचा देशात प्रवासी वाहतुकीसाठी वापर बंद करण्याचा आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोमवारी दिला. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापैकी आठ सदोष विमाने इंडिगो कंपनीकडे तर तीन विमाने गोएअर कंपनीकडे आहेत. प्रॅट अॅण्ड व्हिटनीची पीडब्ल्यू ११०० मॉडेलची ४५० पुढील क्रमांकाची सुटी इंजिने उपलब्ध असली तरी ती विमानांना बसवून त्यांचा वापर करू नये, असेही महासंचालनालयाने या दोन कंपन्यांना कळविले आहे.
हे सदोष इंजिन ऐनवेळी बंद पडण्याची आणखी एक ताजी घटना घडल्यानंतर कोणताही धोका न पत्करण्याच्या उद्देशाने या
इंजिनांची सर्वच विमाने वापरातून काढून घेण्याचे ठरविण्यात आले. इंडिगो कंपनीचे अहमदाबादहून लखनऊसाठी निघालेले एअरबस-३२० निओ विमान सोमवारी
सकाळी इंजिनातील बिघाडामुळे अहमदाबादला परत आणावे
लागले होते.
>अपघातांचा धोका
या इंजिनांमधील दोष लक्षात येताच तशी इंजिने असलेली विमाने वाहतुकीसाठी न वापरण्याचा इशारा युरोपच्या नागरी विमान वाहतूक प्राधकरणाने ९ फेब्रुवारी रोजी प्रथम दिला. त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ज्यात दोन्ही इंजिने अशा प्रकारची आहेत अशा तीन विमानांचा वापर बंद करण्यास इंडिगो कंपनीला सांगितले. मात्र ज्यांत दोनपैकी एक इंजिन सदोष आहे, अशा विमानांचा वार सुरु ठेवला गेला होता. परंतु वापर सुरु ठेवलेल्या अशा विमानांची इंजिने उड्डाणापूर्वी किंवा भर उड्डाणात ऐनवेळी बंद पडम्याच्या घटना गेल्या महिनाभरात लागोपाठ घडल्यानंतर संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन आता अशा सर्वच विमानांचा वापर बंद करण्यात आला आहे.