दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून 11 तोतया टीटीईंना अटक; 15 दिवस ड्युटी, कोणालाच थांगपत्ता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 01:20 PM2022-09-01T13:20:03+5:302022-09-01T13:20:38+5:30
New Delhi Railway Station : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात महत्त्वाच्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station) 11 तोतया टीटीई ड्युटी करताना पकडण्यात आले. हे आरोपी 15 दिवस स्टेशनवर ड्युटी करत होते आणि त्याचा कोणालाच पत्ता नव्हता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आरपीएफने या आरोपींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
एका वृत्तपत्रानुसार, 15 दिवसांपासून हे 11 बनावट टीटीई दिल्लीतील रेल्वे स्टेशनवर ड्युटी करत होते. पांढरा शर्ट व काळी पँट परिधान करून ते तिकिट तपासणीचे काम करत होते. रेल्वे अधिकाऱ्याच्या संशयावरून हा प्रकार उघडकीस आला असून तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी या 11 बनावट तिकीट तपासकांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे रेल्वे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर इतरांच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रेल्वे अधिकारी रितेश वाधवा कानपूर शताब्दी येथून प्रवास करत होते. ट्रेन गाझियाबादला पोहोचली तेव्हा त्यांना एक व्यक्ती तिकीट तपासताना दिसली. चौकशीत त्यांना संशय आला. त्यानंतर त्याला नवी दिल्ली स्थानकात पकडण्यात आले. गोरखपूर येथील भूपेंद्र चौरसिया असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशाच आणखी 10 तरुणांना पकडण्यात आले. काहींची बनावट नियुक्तीपत्रे होती.
सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित
अत्यंत सुरक्षित नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एकाच वेळी 11 तोतया टीटीईंना अटक करण्यात आल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी 15 दिवस रेल्वे स्टेशनवर यायचे, ड्युटी करायचे आणि परत जायचे. मात्र रेल्वे प्रशासन किंवा सुरक्षा यंत्रणांना त्याची माहितीही नव्हती. रेल्वे स्थानकावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात तोतया टीटीई पकडण्याची राजधानीत ही पहिलीच वेळ आहे.