कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान ११ शेतकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 04:53 AM2020-12-13T04:53:45+5:302020-12-13T04:54:01+5:30

सरकारला आणखी किती बळी हवे - राहुल गांधी

11 farmers died during agitation against farm bolls | कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान ११ शेतकऱ्यांचा मृत्यू

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान ११ शेतकऱ्यांचा मृत्यू

Next

चंदिगड/नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट करून मागील १७ दिवसांच्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ११ शेतकऱ्यांची छायाचित्रांसहित यादी दिली आहे. त्यांनी त्यावर भाष्य करताना म्हटले की, ‘कृषी कायदे हटविण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती आहुत्या द्याव्या लागतील?’
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत जोडलेल्या एका पत्रकवजा टिप्पणात म्हटले आहे की, ‘१७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांच्यातील वाटाघाटींतून तोडगा निघण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. टिकरी आणि सिंघू सीमेवर ११ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. 

राहुल गांधी यांनी ११ मृत शेतकऱ्यांची यादी छायाचित्रांसह दिली आहे. छायाचित्रांच्या यादीतील १२वी चौकट त्यांनी रिक्त ठेवून म्हटले आहे की, ‘हे प्रभू, ही चौकट रिक्तच राहू दे.’

कडक सुरक्षेतही बंद केले टोल नाके 
पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात शनिवारी अनेक टोल नाके बंद केले. कुठेही अनुचित घटना होऊ नये, म्हणून दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील टोल नाक्यांवर पोलिसांचे सुरक्षा कडे तयार केले होते. आंदोलनाच्या सतराव्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये उत्साह कायम आहे. सिंघू सीमेवर तिन्ही कायद्यांची ट्रॅक्टरवर वरात काढण्यात आली. भारतीय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नोएडा येथे मुंडन केले. महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही ७०० शेतकऱ्यांसह दिल्ली सीमेवर धडक दिली. शुक्रवारी पलवल इथे पोलिसांनी अडवले असता, त्यांनी मोदी सरकारच्या विरोधी घोषणाबाजी केली.

Web Title: 11 farmers died during agitation against farm bolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.