बिहार लैंगिक अत्याचारातील ११ मुलींची हत्या; आश्रमशाळा संचालकाचं अमानुष कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:55 AM2019-05-04T03:55:28+5:302019-05-04T10:12:40+5:30
बिहारच्या मुझफ्फरपूर आश्रमशाळेचा संचालक ब्रजेश ठाकूर व त्याच्या साथीदारांनी तेथे राहणाऱ्या मुलींपैकी ११ जणींची हत्या केली
नवी दिल्ली : बिहारच्या मुझफ्फरपूर आश्रमशाळेचा संचालक ब्रजेश ठाकूर व त्याच्या साथीदारांनी तेथे राहणाऱ्या मुलींपैकी ११ जणींची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती सीबीआयने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. आश्रमशाळेतील अत्याचारांच्या संदर्भात सीबीआयने नीट चौकशी केली नाही, अशी तक्रार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे केलेल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयने दावा केला की, आश्रमशाळेत लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या काही मुलींनी पूर्वी गायब झालेल्या ११ मुलींची नावे तपास अधिकाऱ्यांना सांगितली. एक आरोपी गुड्डू पटेल याने दाखविलेल्या एका जागी खणले असता, तिथे मानवी हाडे आढळून आली. ब्रजेश ठाकूर व त्याच्या साथीदारांनी ११ मुलींना ठार मारून त्यांचे मृतदेह पुरले असावेत, असा संशय आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने या आश्रमशाळेमधील लैंगिक अत्याचाराच्या कहाण्यांना वाचा फोडली होती. त्यावरून खूप गदारोळ झाल्याने सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला. आश्रमशाळेचा संचालक ब्रजेश ठाकूर व २१ जणांवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. पुढील सुनावणी सोमवारी होईल.