श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ११ जखमी, रस्त्याच्या कडेला पडल्याने मोठी हानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 07:40 AM2024-11-04T07:40:11+5:302024-11-04T07:40:25+5:30
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात रविवारी मुख्य बाजाराजवळील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, ज्यात किमान ११ नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात रविवारी मुख्य बाजाराजवळील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, ज्यात किमान ११ नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असताना या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.
टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळील ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन केंद्राजवळ एका अत्यंत संरक्षक संकुलाच्या जवळ हा हल्ला झाला. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या खानयारमधील महत्त्वाचा पाकिस्तानी कमांडरचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बंकरवर ग्रेनेड फेकले. मात्र, ग्रेनेड रस्त्याच्या कडेला पडले. यात ११ जण जखमी झाले. हा स्फोट आठवडी बाजाराजवळ झाला, जो रविवारचा बाजार म्हणून ओळखला जातो, जिथे हजारोंची गर्दी असते. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली आणि दुकानदारांची धावपळ झाली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
आजपासून अधिवेशन
- सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि चरार-ए-शरीफचे सात वेळा आमदार अब्दुल रहीम राथेर हे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे पहिले सभापती होण्याची शक्यता आहे.
_ जम्मू व काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना होण्याच्या एक वर्ष आधी, २०१८च्या सुरुवातीला झालेल्या शेवटच्या सत्रासह सोमवारी सहा वर्षांहून अधिक कालावधीनंतर सभागृहाची बैठक होईल.