हृदयद्रावक! तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट; ११ जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:31 PM2023-10-17T21:31:16+5:302023-10-17T21:31:35+5:30
Tamilnadu Blast : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात मंगळवारी फटाक्याच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला.
नवी दिल्ली : तामिळनाडूत दोन फटाक्यांच्या कारखांन्यामध्ये मोठा स्फोट झाला, ज्यात नऊ महिलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डझनहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. पहिला स्फोट शिवकाशीमध्ये झाला तर दुसरा स्फोट कम्मापट्टीमध्ये झाला. तामिळनाडू पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरूवात केली.
तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या कारखान्यांकडे फटाके तयार करण्याचे वैध परवाने असल्याचे आढळून आले आहे. तसेच स्फोट कसा आणि का झाला याचा तपास सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
११ जणांचा होरपळून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपालयम येथील फटाक्यांच्या कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे आठ व्यक्ती भाजल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. मृतदेह गंभीररित्या जळाला असल्याने मृतांची ओळख पटू शकली नाही. हे सर्व कामगार असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. अपघातातून बचावलेल्या तिघांचा जखमी झाल्याने मृत्यू झाला.