हुंड्यात मिळाले ११ लाख रुपये, मग वरपित्याने भर लग्नात केले असे काही...
By बाळकृष्ण परब | Published: February 24, 2021 09:51 AM2021-02-24T09:51:14+5:302021-02-24T09:52:11+5:30
11 lakh Rupees got in dowry in Marriage : देशात हुंडाबंदीचा कायदा (Dowry Prohibition Act) होऊन अनेक वर्षे झाली असली तरी आजही अनेक विवाह सोहळ्यांमध्ये हुंडा (Dowry ) दिला, घेतला जातो.
जयपूर - देशात हुंडाबंदीचा कायदा (Dowry Prohibition Act) होऊन अनेक वर्षे झाली असली तरी आजही अनेक विवाह सोहळ्यांमध्ये हुंडा (Dowry ) दिला, घेतला जातो. हुंड्यावरून अनेक विवाह सोहळ्यात वाद होतात, लग्न मोडतात. तर काही महिलांना हुंड्यापायी जीवही गमवावा लागतो. मात्र राजस्थानमधील एका माजी मुख्याध्यापकांनी आपल्या मुलाच्या विवाहात हुंडा मिळाल्यानंतर जे काही केले ते पाहून तुम्ही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. (groom father returned all the 11 lacks rupees to bride father in Rajasthan )
राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील पीपरवाला गावातील माजी मुख्याध्यापक असलेले बृजमोहन मीणा यांच्या मुलाच्या लग्नामध्ये वधुपक्षाकडून ११ लाख १०१ रुपये आणि भगवत गीता एवढा हुंडा देण्यात आला. थाळीमध्ये नोटांच्या बंडलांनी सजवलेली ही रक्कम पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले असते. मात्र मीणा यांनी १०१ रुपये आणि भगवत गीता ठेवून घेत हुंड्यापोटी मिळालेली ११ लाख रुपयांची रक्कम वधुपित्यांकडे परत केली. मीणा यांनी केलेल्या कृतीमुळे विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्यां वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यांच्या या कृतीमुळे हुंड्याविरोधात उठणाऱ्या आवाजाला बळ मिळाले असून, समाजालाही एक चांगला संदेश मिळाला आहे.
यादरम्यान, उपस्थित असलेले समाजाचे पंच, वधूचे पिता राधेश्याम, मंडवराचे माजी सरपंच दादा प्रभू लाल, सेवा निर्मितीचे प्रधानाचार्य कन्हैयालाल मीणा मानी, शिवजी राम मीणा खजुरी यांनी वरपिता बृजमोहन मीणा यांनी उचललेल्या पावलाचे कौतुक केला. तसेच समाजाने यामधून आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, बृजमोहन मीणा यांनी उचललेल्या पावलाचे लोकांनीही कौतुक केले आहे. तर नववधूने सांगितले की, माझ्या सासऱ्यांनी हुंड्यात मिळालेली रक्कम परत करून समाजाला प्रेरणा दिली आहे. आता हुंड्याला विरोध करण्यासाठी अन्य लोकांनीही पुढे आलं पाहिजे, जेणेकरून गरीब कुटुंबातील मुलीला आपल्या योग्यतेनुसार वर निवडता येईल.