पात्रतेसाठी ११ लाख शिक्षकांना आता अखेरची संधी - प्रकाश जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:00 AM2017-09-06T02:00:42+5:302017-09-06T02:01:05+5:30
देशभरातील ११ लाख शिक्षकांना अद्यापही पात्रता मिळवता आलेली नाही. त्यांना पुढील दोन वर्षात ती मिळवण्याची अखेरची संधी दिली जाईल, असे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : देशभरातील ११ लाख शिक्षकांना अद्यापही पात्रता मिळवता आलेली नाही. त्यांना पुढील दोन वर्षात ती मिळवण्याची अखेरची संधी दिली जाईल, असे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी बदल, सशक्तीकरण आणि नेतृत्वासाठी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी उपराष्टÑपती एम. वेंकय्या नायडू यांनी ३१९ शिक्षकांना २०१६च्या राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित केले. ‘दीक्षा’ या डिजिटल व्यासपीठाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला. या राष्टÑीय पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही देशभरातील एक कोटी शिक्षकांचा सन्मान करीत आहोत. कुणी चांगले काम करीत असेल. वर्षभर मन लावून मुलांना शिकवत असेल तर त्यांच्या कामाची प्रशंसा व्हायला हवी. शिक्षकांना प्रतिष्ठा मिळायला हवी. त्याचवेळी शिक्षकांनीही त्याला अनुरूप असे काम करायला हवे. ११ लाख शिक्षकांकडे अजूनही पात्रता नाही. दोन वर्षात त्यांना ही पात्रता मिळवण्याची अखेरची संधी देत आहोत. त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत त्यासाठी नोंदणी करावी लागेल. २०१९ पर्यंत ते उत्तीर्ण न झाल्यास त्यांना नोकरी गमवावी लागेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश प्रेरणादायी आहे. त्यांनी पाच वर्षांत बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले असून आम्हाला ते सार्थकी लावायचे आहे. आपल्यासमोर आव्हाने आहेत. देशात १० लाख सरकारी शाळा आहेत. खासगी शाळा चांगल्या असतील तर सरकारी शाळाही चांगल्या असायला हव्या. तरच आपण शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा उद्देश साध्य करू शकू, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
महाराष्टÑातील २५ शिक्षक-
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व आदर्श कामगिरीसाठी शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील २५ शिक्षकांचा समावेश आहे. त्यातल्या १७ प्राथमिक शिक्षकांपैकी दोन शिक्षकांना व आठ माध्यमिक शिक्षकांपैकी एका शिक्षकाला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय पदक, प्रमाणपत्र व ५० हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नागपूरच्या शंकरनगर येथील मूक बधिर शाळेच्या शिक्षिका डॉ. मीनल सांगोळे यांना विशेष श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सुरेश शिंगणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव चिमलखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा (बुलडाणा), राजेशकुमार फाटे ए.टी., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगाव पंचायत समिती लाखनी (भंडारा), अमीन चव्हाण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, देऊ रवाडा,ता.दिग्रस, (यवतमाळ) यांना प्राथमिक शिक्षकांच्या श्रेणीत पुरस्कृत करण्यात आले. राष्टÑीय पुरस्कार विजेत्या माध्यमिक शिक्षकांमध्ये संजय नारलवार, मुख्याध्यापक, प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. गडचिरोली यांचा समावेश आहे.
आॅपरेशन डिजिटल बोर्ड
पंतप्रधान डिजिटल इंडियाबाबत बोलत आहेत. कालपर्यंत आम्ही आॅपरेशन ब्लॅकबोर्डबद्दल बोलत होतो, मात्र आता येत्या पाच वर्षांमध्ये आॅपरेशन डिजिटल बोर्ड साकार होत आहे. दीक्षा प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देण्यात आला आहे. आता शिक्षकांना यू ट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येईल, असे जावडेकर यांनी नमूद केले.