ममता बॅनर्जींचा शिरच्छेद करणाऱ्यास ११ लाख
By admin | Published: April 13, 2017 01:18 AM2017-04-13T01:18:02+5:302017-04-13T01:18:02+5:30
पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीदिनी भगवान श्रीराम यांचा जयघोष करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता
अलिगढ : पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीदिनी भगवान श्रीराम यांचा जयघोष करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भाजयुमोचे नेते योगेश वार्ष्णेय म्हणाले की, ‘‘बॅनर्जी यांचे सरकार लोकांना मारहाण करीत आहे. जर कोणाच्या अंगात लाल शर्ट किंवा लाल पँट असेल तर त्यांना पोलीस क्रूर मारहाण करतात. बॅनर्जी इफ्तार पार्टी आयोजित करतात. त्या मुस्लिमांच्या वतीने बोलतात.
मला त्यांना हे विचारायचे आहे की हिंदू हे मानव नाहीत का?’’ त्यांच्यात जर कोणतीही माणुसकी शिल्लक असती तर त्यांनी अशा पद्धतीने मारहाण केली नसती. जर कोणी बॅनर्जी यांचे शिरच्छेद
केलेले डोके मला आणून दिले तर मी त्याला ११ लाख रुपये देईन, असे वार्ष्णेय पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करताना म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सुरी (जिल्हा बीरभूम) येथे श्रीरामाचा जयजयकार करणाऱ्या मेळाव्याला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता.
पोलिसांनी मिरवणुकीसाठी लोखंडी पाईपने अडथळे निर्माण
केले होते. मिरवणुकीतील
काही जणांनी ते तोडण्याचा
प्रयत्न केल्यावर पोलिसांनी लाठीमार केला. (वृत्तसंस्था)
वार्ष्णेय यांना अटक करा
कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या हत्येसाठी भाजयुमो नेत्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आल्याच्या घटनेचा तृणमूल काँग्रेसने बुधवारी निषेध केला. राजकारणातील गुंड प्रवृत्तीने बॅनर्जी यांना ही धमकी दिली आहे. धमकी देणारे योगेश वार्ष्णेय यांना तात्काळ अटक का झाली नाही, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे नेते व राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी विचारला आहे.
संसदेतही निषेध
नवी दिल्ली : भाजयुमोच्या नेत्याने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तीव्र शब्दांत धिक्कार केला.