अमेरिकेत एका दिवसात ११ लाख नवे कोरोना रुग्ण; जगात २१ लाख नवे बाधित आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:01 AM2022-01-12T09:01:47+5:302022-01-12T09:02:00+5:30
जगभरात काेराेना संसर्गाचे प्रमाण घटत असल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली : जगभरात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही अमेरिकेत काेराना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली असून एका दिवसात ११ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच रुग्णालयात दाखल हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत सुमारे १ लाख ४२ हजार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांवरील शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे.
जगभरात काेराेना संसर्गाचे प्रमाण घटत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जगात २१.०४ लाख बाधितांची नाेंद झाली. तीन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे काेराेनाच्या नव्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जगभरात काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर ७ जानेवारीला सर्वाधिक २७.५६ लाख बाधितांची नाेंद झाली हाेती. त्यानंतर त्यात घट हाेताना दिसत आहे. ८ जानेवारीला २६.९४ लाख, ९ जानेवारीला २४ लाख आणि १० जानेवारीला २१ लाख बाधित आढळले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये ९.५५ लाख बरे झाले असून, ४ हजार ६०८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांनी लसीकरण मोहीम सुरू केली असली तरी या लाटेमध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांनी लॉकडाउनचा मार्ग पत्करला आहे.
लाॅकडाऊनला विराेध
युराेपमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे जर्मनीसह काही देशांनी निर्बंध लागू केले. मात्र, नागरिकांनी त्यास विराेध केला आहे. जर्मनीमध्ये हजाराे नागरिक निर्बंधांच्या विराेधात रस्त्यांवर उतरले, तर इटलीमध्ये लसीकरणाबाबत कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये आणखी एका शहरात लाॅकडाऊन
चीनने ५५ लाख लाेकसंख्या असलेल्या अनयांग शहरात लाॅकडाऊन लावले आहे. शहरात २ जण ओमायक्राॅनबाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी शिआन आणि युझाेऊ या दाेन शहरांमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आले हाेते.
मेक्सिकोच्या राष्ट्रपतींना दुसऱ्यांदा संसर्ग
मेक्सिकाेचे राष्ट्रपती एंद्रेस मॅन्युएल ओब्रादाेर यांना दुसऱ्यांदा काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना साैम्य लक्षणे आहेत. यापूर्वी गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्यांना काेराेनाचा संसर्ग झाला हाेता.