नक्षली हल्ल्यात ११ पोलिस शहीद, आयईडी स्फोटात उडविले वाहन; PM मोदींकडून शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 07:29 AM2023-04-27T07:29:17+5:302023-04-27T07:30:30+5:30

आयईडी स्फोटात उडविले वाहन; दोन वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला

11 police martyred in Naxalite attack, vehicle blown up in IED blast; Condolences from Modi | नक्षली हल्ल्यात ११ पोलिस शहीद, आयईडी स्फोटात उडविले वाहन; PM मोदींकडून शोक

नक्षली हल्ल्यात ११ पोलिस शहीद, आयईडी स्फोटात उडविले वाहन; PM मोदींकडून शोक

googlenewsNext

दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी नक्षलवाद्यांनी एक वाहन उडवून दिल्याने दहा पोलिसांसह वाहनाचा चालक शहीद झाला. गेल्या दोन वर्षांत राज्यातील सुरक्षा दलांवर नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी सांगितले की, राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अरणपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयईडी वापरून हा स्फोट घडविण्यात आला. डीआरजी कर्मचारी बहुतेक स्थानिक आदिवासी लोकांमधून भरती केले जातात आणि त्यांना माओवाद्यांशी लढण्यासाठी प्रशिक्षित केले जाते.  

ज्या भागात स्फोट झाला तो भाग राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे ४५० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. घटनास्थळी १० फूट खोल खड्डा दिसत असून, रस्ता दुभंगला आहे. या हल्ल्यात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. घटनास्थळाची छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहेत. 
या परिसरात दर्भा विभागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचारी दंतेवाडा जिल्हा मुख्यालयातून निघाले होते. ते मिनी गुड्स व्हॅनमध्ये परतत असताना नक्षलवाद्यांनी अरनपूर आणि समेली गावांदरम्यान स्फोट घडवून आणले. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली.

नेमके काय झाले...
n नक्षलवाद्यांनी ४० किलो स्फोटक असलेले आयईडी वापरून स्फोट केला. सुमारे २०० सुरक्षा कर्मचारी दंतेवाडा जिल्हा मुख्यालयातून निघाले होते. बुधवारी सकाळी अरनपूरपासून सुमारे सात किमी अंतरावर नहाडी गावाजवळ गस्त पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. त्यानंतर दोन संशयित नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी वाहनांच्या ताफ्याने त्यांच्या मूळ ठिकाणी परतत होते.  
n वाहनांमध्ये सुमारे १००- १५० मीटरचे अंतर होते आणि नक्षलवाद्यांनी ताफ्यातील दुसऱ्या वाहनाला लक्ष्य केले. स्फोटानंतर सोबतच्या वाहनांमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जंगलाच्या दिशेने गोळीबार केला. 

छत्तीसगड, झारखंडमधील सक्रिय 
नऊ नक्षलींने केले आत्मसमर्पण
गोंदिया : बलरामपूर (छत्तीसगड) जिल्ह्यातील सामरी पोलिस स्टेशन परिसरात आणि लगतच्या झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांनी बलरामपूरचे पोलिस अधीक्षक मोहित गर्ग यांच्यासमोर मंगळवारी आत्मसमर्पण केले. तीन नक्षलवाद्यांनी एक लोडेड बंदूक आणि एकाने आयईडी आणि स्फोटकांसह आत्मसमर्पण केले आहे. बहुतांश नक्षलवादी हे शस्त्र चालवणे, आयईडी पेरण्यातही निपुण आहेत. 

आजवरचे माेठे नक्षली हल्ले 
३ एप्रिल २०२१ 
सुकमा व विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर हल्ल्यात २२ सुरक्षा कर्मचारी शहीद
२१ मार्च २०२०
सुकमा जिल्ह्यातील मिनपा भागात नक्षलवादी हल्ल्यात १७ जवान शहीद
९ एप्रिल २०१९ दंतेवाडा जिल्ह्यातील स्फोटात भाजप 
आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू. चार सुरक्षा कर्मचारी शहीद. 
२४ एप्रिल २०१७ सुकमा जिल्ह्यातील हल्ल्यात २५ जवान शहीद
६ एप्रिल २०१०  ताडमेटलाच्या हल्ल्यात ७६ सुरक्षा जवान शहीद

पंतप्रधानांकडून श्रद्धांजली 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. मोदी म्हणाले, त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.
पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
    - अमित शाह, 
    केंद्रीय गृहमंत्री
नक्षलविरुद्धचा लढा शेवटच्या टप्प्यात असून, नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही
    - भूपेश बघेल,     मुख्यमंत्री
भ्याड हल्ला:काँग्रेस
नक्षलवाद्यांचे हे भ्याड कृत्य असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, दहा जवान आणि चालक शहीद झाल्याची बातमी दु:खद आहे. या कठीण काळात मी शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आहे.

Web Title: 11 police martyred in Naxalite attack, vehicle blown up in IED blast; Condolences from Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.