महाराष्ट्रामधील ११ जण ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 06:36 AM2019-01-26T06:36:01+5:302019-01-26T06:36:15+5:30
आदिवासी भागात आरोग्यसेवेचे काम करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीस सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे गायक-संगीतकार शेकर महादेवन या ११ जणांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कार जाहीर केले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लार्सन अँड टुब्रोचे अनिलकुमार नाईक, प्रख्यात नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, आदिवासी भागात आरोग्यसेवेचे काम करणारे डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, लातूरमध्ये वैद्यकीस सेवा देणारे डॉ. अशोक कुकडे गायक-संगीतकार शेकर महादेवन या ११ जणांचा समावेश आहे.
प्रख्यात लोकगायिका तीजनबाई यांना ‘पद्मविभूषण’ तर नामवंत पत्रकार स्व. कुलदीप नय्यर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हुकूमदेव यादव हेही यंदा ‘पद्मभूषण’चे मानकरी ठरले आहेत. याखेरीज अलीकडेच निधन झालेले अभिनेते कादर खान, क्रिकेटपटू (पान ११ वर)(पान १ वरुन) गौतम गंभीर, नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा आणि माजी अधिकारी एस. जयशंकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व डॉ. अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण किताबाने तर डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री किताब मिळणाऱ्यांमध्ये शंकर महादेवन, डॉ. कोल्हे दाम्पत्य, अभिेनेता मनोज वाजपेयी, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते सुदाम काटे, साहित्यिक नगीनदास संघवी, वन्यप्राणी सेवा कार्यकर्ते शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे.
यंदाच्या ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यापैकी चार जणांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण आणि ९४ जणांना पद्मश्री किताब जाहीर झाले आहेत. यामध्ये २१ महिला असून, ११ परदेशी नागरिक आहेत. कादर खान यांचा उल्लेख कॅनडामधील रहिवासी असा आहे. तर तीन जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. याखेरीज यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एका तृतीयपंथी व्यक्तीचीही पद्म पुरस्कारासाठी सरकारने निवड केली आहे.