बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:32 AM2022-09-16T11:32:53+5:302022-09-16T11:33:28+5:30
Banking News: एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
अहमदाबाद - अचानक बँक खात्यात हजारो रुपये आल्यास लोक त्रस्त होतात. त्यानंतर हे पैसे कुठेही खर्च करून टाकतात. मात्र गुजरातमधील एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्यक्तीने या रकमेतील काही रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवली आणि त्यामधून एका दिवसात लाखो रुपयांचा नफा कमावला.
बँकिंग सिस्टिममधील तांत्रिक चुकीमुळे अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचे प्रकार घडतात. मात्र आता गुजरातमधील अहमदाबादमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. येथे बँकेच्या चुकीमुळे रमेश सागर नावाच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ११ हजार ६७७ कोटी रुपये जमा झाले.
रमेश सागर केल्या पाच सहा वर्षांपासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत आहेत. एक वर्षापूर्वी त्यांनी कोटक सिक्युरिटीजसोबत आपलं डीमॅट खातं उघडलं होतं. त्यांनी सांगितलं की, २७ जुलै २०२२ रोजी अचानक माझ्या खात्यामध्ये ११६,७७,२४,४३,२७७ एवढा बॅलन्स दिसू लागला. सागर यांनी त्यातील दोन कोटी रुपये शेअर बाजारामध्ये गुंतवले आणि एका दिवसात त्यावर पाच लाख रुपयांचा नफा कमावला.
मात्र गडबड लक्षात आल्यानंतर बँकेने त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत घेतली. पण तोपर्यंत सागर यांनी काही तासांमध्ये पाच लाख रुपयांची कमाई केली. रमेश सागर यांच्या म्हणण्यानुसार इतर डीमॅट खातेधारकही त्या दिवशी जॅकपॉट मिळवण्यासाठी भाग्यशाली होते.