PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 05:43 PM2024-07-06T17:43:33+5:302024-07-06T17:44:26+5:30
यानंतर पीडित पती आणि कुटुंबीयांनी विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करत दुसरा हप्ता न देण्याची विनंती केली आहे. यानंतर, विभागानेही देण्यात आलेले सरकारी पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
केद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून गरिबांना एक आधार म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर बांधता येईल. मात्र, उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात असे घडले नाही. या उलट त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. येथे प्रधानमंत्री आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या महिलांना 40 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता.
यानंतर पीडित पती आणि कुटुंबीयांनी विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करत दुसरा हप्ता न देण्याची विनंती केली आहे. यावर, विभागानेही देण्यात आलेले सरकारी पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गावात आणि शहरी भागांत राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सरकार घर बांधण्यासाठी पैशांची मदत करते. माध्यमांतील वृत्तांनुसार, वर्ष 2023-24 मध्ये, महाराजगंजच्या निचलौल भागात एकूण 108 गावांमधील 2350 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यांपैकी जवळपास दोन हजारहून अधिक लाभार्थ्यांच्या घराची कामे पूर्ण ही झाली आहेत. याअंतर्गत संबंधित 11 महिला लाभाऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री आवासचा पहिला हप्ता पाठवण्यात आला होता. मात्र, हा हप्ता मिळताच या महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाल्या.
पती 'तणावात', अधिकारी 'हैराण' -
प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलांचे पती सध्या तणावात आहेत. त्यांनी आता, आपल्या पत्नीच्या खात्यात दुसरा हाप्ता पाठवू नये, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली आहे. याशिवाय, हप्त्याची रक्कम वसूल करण्यासंदर्भात त्यांना नोटीस येते की काय, याची भीतीही त्यांना सतावू लागली आहे. सरकारी मदतीतून घर होईल, अशी आशा त्यांना होती. मात्र, या उलट त्यांचे घरच उद्ध्वस्त झाले आहे. यानंतर आता चौकशीअंती, काही लाभार्थ्यांच्या हप्त्याची रक्कम रोखण्यात आली आहे.