ना घर मिला ना घरवाली! पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेऊन ११ महिला बॉयफ्रेंडसोबत पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:31 PM2024-07-11T12:31:30+5:302024-07-11T12:32:54+5:30
काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे.
प्रत्येक गरीब व्यक्तीच्या डोक्यावर छत असावं, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. पण काही लोकांनी किंवा अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या पैशांचा गैरवापर केल्याच्याही घटना घडल्या आहे. पण उत्तर प्रदेशात एक अजब घटना समोर आली आहे.
काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 11 महिला पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या. हे अनोखं प्रकरण असून संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासनासोबतच ही घटना सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांच्या पत्नी पैसे घेऊन बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्या आहेत, त्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. अडचण अशी आहे की, या लोकांना घर बांधण्यासाठी मिळणारा पहिला हप्ता घेऊन महिला पळून गेल्या, आता प्रशासनाने त्यांचा दुसरा हप्ताही थांबवला आहे. आता हे लोक अशा अवस्थेत सापडले आहेत की त्यांना ना घर मिळत आहे ना बायको.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील सुमारे २,३५० लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पैसे मिळाले आहेत. यातील बहुतांश लाभार्थी महाराजगंजमधील ठूठीबारी, शितलपूर, चटिया, रामनगर, बकुल डीहा, खसरा, किशूनपूर आणि मेधौली गावातील आहेत. यातील अनेक घरांचं बांधकाम पूर्ण झालं आहे.
दोन हजार लाभार्थ्यांपैकी सुमारे ११ महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचा ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन आपल्या नवऱ्यांना सोडल्याची माहिती मिळत आहे. या महिलांनी पैसे घेऊन बॉयफ्रेंडसह पळ काढला. पंतप्रधान योजनेअंतर्गत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरं बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीनुसार निधीचे वाटप केले जाते.