याला म्हणतात नशीब! भीक मागून पोट भरणारा 11 वर्षीय मुलगा निघाला लखपती; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:48 PM2022-12-16T16:48:09+5:302022-12-16T16:56:00+5:30
कोरोना काळात मुलाच्या आईचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोट भरण्यासाठी मुलगा भीक मागत होता.
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. जिथे भीक मागून पोट भरणारा 11 वर्षीय मुलगा लखपती झाल्याची घटना घडली आहे. कोरोना काळात मुलाच्या आईचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोट भरण्यासाठी मुलगा भीक मागत होता. मात्र मुलाच्या आजोबांनी त्यांची अर्धी संपत्ती हा मुलाच्या नावे केली आहे. कुटुंबीय मुलाचा शोध घेत होते. मुलाच्या आजोबांना विश्वास होता की एक दिवस त्यांचा नातू त्यांना नक्की सापडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये देवबंदच्या नागल पंडोली गावात राहणारी इमराना नाराज होऊन आपल्या सासरच्या घरातून निघून गेली. याच दरम्यान पती अनेकदा पत्नीला परत घरी आणण्यासाठी गेला. पण पत्नीने ऐकलं नाही. ती पुन्हा घरी आली नाही. यानंतर इमराना आपल्या लहान मुलाला घेऊन उत्तराखंडच्या कलियरमध्ये आली. कुटुंबीयांनी तिला खूप शोधलं पण तिचा काहीच पत्ता लागला नाही.
पत्नी आणि मुलगा आपल्यापासून दुरावला, आपल्याला सोडून गेला या दु:खात इमरानाच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी कोरोनाचा प्रसार झाला आणि लॉकडाऊन लागला. याच दरम्यान इमरानाच्या देखील मृत्यू झाला आणि मुलगा साहजेब अनाथ झाला. आजोबांनी आपल्या नातवाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. सोशल मीडियावर नातवाचे काही फोटो शेअर केले. तसेच पेपरमध्येही फोटो छापले.
काही दिवसांपूर्वी एका दूरच्या नातेवाईकाला कलियरमध्ये साहबेज दिसला. त्याने Whatsapp वरून साहजेबच्या फोटोची ओळख पटवली आणि तातडीने कुटुंबीयांना याबाबत सूचना दिली. तसेच मोबिनने त्या लहान मुलाला आपल्या नातेवाईकांकडे पोहोचवलं. मुलाच्या वडिलांचं गावाला एक घर आहे. ज्याची किंमत ही जवळपास 20 ते 25 लाख रुपये आहे. तसेच मुलाच्या नावावर काही जमीन सुद्धा आहे. म्हणजे जवळपास 50 लाखांची संपत्ती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"