आसाम निवडणुकीच्या काळात 110 कोटींचे साहित्य केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:04 AM2021-04-01T06:04:57+5:302021-04-01T06:06:02+5:30
आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले.
गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले. राज्याच्या आजवरच्या निवडणुकीच्या काळातील ही सर्वाधिक जप्ती आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध संस्थांनी २० कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले होते. यावेळी २६ फेब्रुवारी रोजी आसाम विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ११०.८३ कोटी रुपयांची रोख रक्कम व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३४.२९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३३.२९ कोटी किमतीची १६.६१ लाख लीटर दूर, २४.५० कोटी रुपयांची रोख रक्कम व ३.६८ कोटी रुपयांचे सोने-चांदी जप्त करण्यात आले.
आसाम पोलीस, फिरती पथके, अबकारी विभागासह अन्य संस्थांनी या सर्व वस्तू आसामच्या विविध जिल्ह्यांतून जप्त केल्या आहेत. भेटवस्तू, विदेशी बनावटीच्या सिगारेट, पान मसाला, सुपारी यासह अन्य अनेक वस्तूही जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत १४.९१ कोटी रुपये आहे.
राज्यात निवडणूक खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यासंबंधीचे ५० गुन्हे नोंदले गेले आहेत. तर अबकारी नियमांच्या उल्लंघनाबाबत ५,२३४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तथापि, या संबंधात किती लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, याची त्यांनी माहिती दिली नाही.
आचारसंहिता भंगची २,६९६ प्रकरणे
आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची आसाममध्ये एकूण २,६९६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यात १,२७२ प्रकरणे ऑनलाइन ई-व्हिजील ॲपच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहेत. यातील ९०८ प्रकरणे योग्य ठरली आहेत.
- अर्पणा माधव, गुवाहाटी