मंदिरातील अग्नितांडवाचे ११० बळी

By admin | Published: April 11, 2016 03:36 AM2016-04-11T03:36:37+5:302016-04-11T03:36:37+5:30

केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध पुत्तिंगल देवी मंदिराच्या परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असता फटाक्यांच्या आतशबाजीच्या वेळी भीषण आग लागून किमान ११० भाविक मृत्युमुखी पडले

110 victims of fire brigade in the temple | मंदिरातील अग्नितांडवाचे ११० बळी

मंदिरातील अग्नितांडवाचे ११० बळी

Next

कोल्लम : केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध पुत्तिंगल देवी मंदिराच्या परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असता फटाक्यांच्या आतशबाजीच्या वेळी भीषण आग लागून किमान ११० भाविक मृत्युमुखी पडले तर ३८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले.
आतशबाजीला जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली नव्हती; मात्र वार्षिक उत्सवाच्या वेळी परंपरेनुसार आतशबाजी केली जाते. पहाटे ३.३० वाजतादरम्यान आतशबाजी बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराजवळील ‘कंबपुरा’ गोदामावर आगीची ठिणगी पडली आणि स्फोट होऊन एकाचवेळी भीषण कर्णभेदी आवाजांनी परिसर दणाणून गेला. स्फोट एवढा भीषण होता की, आवाज किमान १ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. लगेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसर अंधारात बुडाला असताना लोक जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
पंतप्रधान मोदी कोल्लमला...
पुत्तिंगल देवी मंदिरातील भीषण अग्निकांडानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे तातडीने धाव घेतली. ते तिरुवनंतपुरम्ला खास विमानाने पोहोचल्यानंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले. कोल्लमला पोहोचल्यानंतर ते जखमींना बघण्यासाठी थेट वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. केरळवासीयांचे दु:ख वाटून घेण्यासाठी पंतप्रधान मोदी तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेसुद्धा या दु:खाच्या क्षणी धावून आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे चंडी यांनी म्हटले.
दहा लाखांची मदत...
चंडी यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंदिर परिसरात अडकलेल्यांना आणि जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी नौदल आणि वायूदलाच्या सहा हेलिकॉप्टरची तसेच एका डॉर्नियर विमानाची मदत घेण्यात आली.

——————————————-
देशासाठी ठरला काळा रविवार...
केरळमधील भीषण अग्निकांडाने रविवारी देश हादरून गेला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेते आणि मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मंदिरातील आग धक्कादायक आणि हृदयद्रावक असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी शोकसंवेदना तर जखमींसाठी प्रार्थना करतो आहे, असे मोदींनी कोल्लम येथे भेट दिल्यानंतर जारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करीत आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही शोकसंदेश जारी केला.
————————-
अमिताभ यांचे रिटिष्ट्वट...
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी अणीबाणीच्या हेल्पलाइनचे नंबर स्वत: रिटिष्ट्वट करीत मृतांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. चित्रपटनिर्माते शेखर कपूर, जॉन अब्राहम, अभिनेत्री दिया मिर्झा, अभिनेते - दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनी आगीत निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल टिष्ट्वट जारी करीत तीव्र शोक व्यक्त केला आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: 110 victims of fire brigade in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.