अमेरिकेतील १,१०० मंदिरांमध्ये आठवडाभर चालणार भव्य उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:41 AM2023-12-23T05:41:00+5:302023-12-23T05:41:08+5:30

२१ जानेवारीला मंदिरे दिव्यांनी उजळून निघणार; राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट सातासमुद्रापार प्रक्षेपण

1,100 temples in America will be celebrated for a week | अमेरिकेतील १,१०० मंदिरांमध्ये आठवडाभर चालणार भव्य उत्सव

अमेरिकेतील १,१०० मंदिरांमध्ये आठवडाभर चालणार भव्य उत्सव

वॉशिंग्टन : पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेतील तब्बल ११०० मंदिरांमध्ये आठवडाभर विशेष सोहळ्याचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. या मंदिरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

हिंदू मंदिर एम्पॉवरमेंट कौन्सिलच्या (एचएमईसी) तेजल शाह यांनी सांगितले की, या उत्सवाचा एक भाग होणे हे आमचे भाग्य आहे. आमच्या स्वप्नांतील मंदिर दीर्घ संघर्षानंतर आणि प्रतीक्षेनंतर आकार घेत होत आहे. अमेरिका आणि कॅनडामधील प्रत्येकजण याबद्दल खूप उत्सुक आहे. राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. एचएमईसी ही अमेरिकेतील ११०० हून अधिक हिंदू मंदिरांची सर्वोच्च संस्था आहे.

शाह म्हणाले की, उत्तर अमेरिकेतील लहान-मोठ्या मंदिरांमध्ये आठवडाभर चालणारा उत्सव १५ जानेवारीपासून सुरू होईल आणि अयोध्येतून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाने त्याची सांगता होईल. या महोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक मंदिरांमध्ये पोहोचतील.

सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होणार
आमच्यासाठी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर वेळेनुसार २१ जानेवारी रोजी ११ वाजता प्राणप्रतिष्ठा होईल. यामुळे त्या रात्री प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार आहोत. प्रत्येक आठवड्यात १०० हून अधिक मंदिरे कार्यक्रमांसाठी नोंदणी करत आहेत, असेही शाह म्हणाले.

असा असेल कार्यक्रम
n१५ जानेवारीच्या कार्यक्रमाची सुरुवात रामनाम कीर्तनाने होईल.
nॲटलांटा येथील प्रसिद्ध कलाकार विनोद कृष्णन यांचे भजन गायन होणार आहे. ते प्रभू रामाची काही लोकप्रिय नवीन भजने गातील.
n२१ जानेवारीला मंदिरांवर रोषणाई करण्यात येणार आहे.
nअयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण करण्याची आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य मुहूर्तावर शंख फुंकण्याची योजना आहे, त्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाईल.
 

Web Title: 1,100 temples in America will be celebrated for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.