बिहारमध्ये दारूबंदी समर्थनार्थ ११,२९२ किलोमीटर लांबीची मानवी साखळी
By admin | Published: January 22, 2017 12:45 AM2017-01-22T00:45:10+5:302017-01-22T00:45:10+5:30
राज्य सरकारने केलेल्या दारूबंदीला पाठिंबा देण्यासाठी आणि जनजागृती घडवून आणण्यासाठी बिहारमधील दोन कोटी विद्यार्थी व स्त्री-पुरुष यांनी शनिवारी ११ हजार २९२ किलोमीटर लांबीची
- एस. पी. सिन्हा, पाटणा
राज्य सरकारने केलेल्या दारूबंदीला पाठिंबा देण्यासाठी आणि जनजागृती घडवून आणण्यासाठी बिहारमधील दोन कोटी विद्यार्थी व स्त्री-पुरुष यांनी शनिवारी ११ हजार २९२ किलोमीटर लांबीची मानवी शृंखला तयार केली. ही जगातील सर्वात मोठी मानवी साखळी होती, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. दारूबंदी समर्थनाच्या मानवी साखळीला संपूर्ण बिहारमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता.
मुख्यमंत्र्यांबरोबरच सर्व मंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव, विधानसभा व विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी तसेच सर्व आमदार हेही मानवी साखळीत एकमेकांचे हात धरून उभे असल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, अन्य सचिव तसेच प्रशासनातील आणि पोलीस खात्यातील ज्येष्ठ अधिकारीही त्यात होते. इतकेच नव्हे, तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी, पक्षाचे प्रवक्ते शहानवाज हुसेन, राम कृपाल यादव यांनीही सिवानमध्ये मानवी साखळीमध्ये भाग घेतला. आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ नव्हे, तर दारूबंदीला पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळीमध्ये सहभागी झालो आहोत, असे शहानवाज हुसेन यांनी सांगितले. मध्यंतरी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे दारूबंदीबद्दल नितीश कुमार यांचे कौतुक केले होते. बहुधा त्याचमुळे भाजपा नेते व कार्यकर्ते मानवी साखळीमध्ये सहभागी झाल्याची चर्चा इथे होती.
गिनीज बुकमध्ये नोंद
११ हजार २९२ किलोमीटरची मानवी साखळी आतापर्यंत कोणीच पाहिलेली नाही. त्यामुळे या साखळीची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. या मानवी साखळीची छायाचित्रे टिपण्यासाठी इस्त्रोने भारतीय आणि परदेशी तीन सॅटेलाइट्सचा वापर केला. त्याखेरीज ४0 ड्रोन आणि चार विमानांद्वारे या साखळीचे चित्रिकरण केले.